Nitin Desai : दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, लगान ते जोधा अकबर, डोळे दिपवणारे सेट उभारले; कोण होते नितीन देसाई?
Nitin Desai : नितीन देसाई हे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.
Nitin Desai : लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्याच एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोण होते नितीन देसाई? (Who Is Nitin Desai)
नितीन देसाई यांचा जन्म दापोलीत 9 ऑगस्ट 1965 रोजी झाला. लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत ते निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेही होते. अनेक सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. अनेक लोकप्रिय सिनेमांच्या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. नितीन देसाई यांचं संपूर्ण नाव नितीन चंद्रकांत देसाई.
दापोलीतील निसर्गरम्य वातावरण नितीन देसाई यांच्यातील कलाकारांना घडवण्यास कारणीभूत ठरला. सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी नितीन देसाई यांनी मुंबईतल्या सर.जे.जे कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे त्यांनी सुरुवातीला कलादिग्दर्शनाचे धडे गिरवले.
नितीन देसाई यांच्या भव्य सेट्सनी सर्वांचे डोळे दिपवून टाकले आहेत. कलादिग्दर्शनामध्ये यश मिळाल्यानंतर नितीन देसाई यांनी सिनेमांच्या आणि मालिकांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. आजवर कोणत्याही सिनेमाचं कलादिग्दर्शन त्यांनी अभ्यासपूर्ण रितीने केलं आहे. कलाकृतीतील पात्रांचा, प्रसंगांचा आणि घटनांचा विचार करत त्यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे त्यांनी निर्मिती केलेले सेट्स आखीव-रेखीव आणि प्रेक्षणीय ठरले.
अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन केलेले नितीन देसाई
नितीन देसाई यांनी '1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन केलं आहे. '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांनी खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला.'डिस्कव्हरी ऑफ इंडिया', 'तमस','चाणक्य', 'मृगनयनी' यांसारख्या मालिकांचं कलादिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. मराठी आणि हिंदी सिनेमांचं कलादिग्दर्शन करण्यासोबत त्यांनी 'सलाम बॉम्बे', 'बुद्धा', 'जंगल बुक','कामसूत्र','सच अ लाँग जर्नी','होली सेफ' या हॉलिवूडपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.
नितीन देसाईंनी कलादिग्दर्शनात यश मिळू लागल्यानंतर मालिका आणि सिनेमांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. 'राजा शिवछत्रपती', 'बाजीराव मस्तानी','मराठी पाऊल पडते पुढे' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांची आणि 'बालगंधर्व'सारख्या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे. पुढे 'अजिंठा' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं.
संबंधित बातम्या