मुंबईहून यूपीतील मूळगावी पोहोचताच नवाजुद्दीन सिद्दीकी होम क्वॉरन्टाईन!
लॉकडाऊनदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईहून यूपीतील आपल्या मूळगावी गेला. तिथे गेल्यावर त्याला होम क्वॉरन्टाईन होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई : लॉकडाऊनच्या या वातावरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईवरुन उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाणा गावात पोहोचला. पण नवाजुद्दीन सिद्दीकीला विशेष प्रवास पास घेऊन मुंबईहून आपल्या मूळगावी जाण्याची गरज का भासली याबाबत एबीपीला खास माहिती मिळाली आहे.
त्याआधी नवाजुद्दीन सिद्दीकी 10 मे रोजी मुंबईहून वाहनाने उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील आपल्या बुढाणा या मूळगावाच्या दिशेने रवाना झाला होता. 12 मे रोजी तो गावाला पोहोचला. या प्रवासात त्याच्यासोबत आई मेहरुनिस्सा सिद्दीकी, धाकटा भाऊ फैजुद्दीन सिद्दीकी आणि धाकट्या भावाची पत्नी होते. तिथे पोहोचल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली. 15 मे रोजी त्याचे अहवाल मिळाले, ज्यात तो कोरोना निगेटिव्ह असल्याचं समोर आलं. पण नियमानुसार रुग्णालय प्रशासनाने नवाजुद्दीनला 14 दिवसांसाठी होम क्वॉरन्टाईन राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे तो पालन करत असून 25 मेपर्यंत त्याला होम क्वॉरन्टाईनमध्येच राहावं लागेल.
नवाज ईदसाठी मूळगावी गेल्याची चर्चा नवाजुद्दीन सिद्दीकी लॉकडाऊनदरम्यान आपल्या मूळगावी गेल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. ईद साजरा करण्यासाठी नवाजुद्दील बुढाणाला गेल्याचं म्हटलं जात होतं. पण नवाज आणि त्याच्या कुटुंबाने या वृत्ताचा इन्कार केला आहे. नवाजच्या आधी त्याचा भाऊ शमास सिद्दीकी याने ट्वीट करुन त्याच्या वतीने स्पष्टीकरण दिलं. "माझा भाऊ, आई आणि इतर नातेवाईक ईदसाठी नाही तर आईची ढासळलेली तब्येत पाहता तिला घेऊन गावाला गेलो आहोत," असं शमास सिद्दीकीने सांगितलं
तर त्यानंतर नवाजुद्दीनेही ट्वीट करुन माहिती दिली. "धाकट्या बहिणीच्या निधनानंतर माझ्या 71 वर्षीय आईला दोन वेळा एन्झायटी अटॅक आला आहे. आम्ही राज्य सरकारच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे. यावेळी माझ्या बुढाणा गावात होम क्वॉरन्टाईन आहोत," असं ट्वीट नवाजुद्दीन सिद्दीकीने केलं आहे.
Due to the recent loss of my younger sister, my mother who is 71yrs old got anxiety attack twice. We have followed all the guidelines given by the State Government. We are #HomeQuarantined at our hometown Budhana. Please #StaySafe #StayHome
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) May 18, 2020
जवळच्या सूत्रांनी काय माहिती दिली?
नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईहून बुढाणापर्यंतचा 1500 किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास का केला? या प्रश्नावर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एका जवळच्या व्यक्तीने एबीपी न्यूजला सांगितलं की, "त्याची आई मेहरुनिस्सा सिद्दीकी डोळ्यांच्या उपचारांसाठी बुढाणाहून मुंबईला आली होती. उपाचारानंतर गावाला परतणार, तेवढ्यात देशभरात लॉकडाऊन लागू झाला आणि त्या गावाला जाऊ शकल्या नाहीत."
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, "गावात राहिलेल्या, तिथली सवय असलेल्या नवाजुद्दीनची आई बेचैन झाली होती. त्यांचा रक्तदाबही सतत वाढत होता. लॉकडाऊनमध्ये आईची ढासळती प्रकृती लक्षात घेता नवाजुद्दीन सिद्दीकीने तिला गावाला सोडण्याचा निर्णय घेतला. नवाजुद्दीनने वैद्यकीय कारणाच्या आधारावर मुंबई पोलिसांकडून प्रवासाचा पास मिळवला. त्यानंतर आई, पत्नी आणि भावासह स्वत:च गावापर्यंतचा प्रवास करण्याचा निश्चय केला.त्यानुसार 10 मे रोजी मुंबईहून निघाला आणि 12 मे रोजी गावाला पोहोचला. सध्या हे सगळे जण होम क्वॉरन्टाईन आहेत.