Aditi Dravid : कौतुकास्पद! मराठमोळ्या आदिती द्रविडने आंतरराष्ट्रीय पातळीवर रोवला भारताचा झेंडा
Aditi Dravid : आदिती द्रविडला 'बर्लिन चित्रपट महोत्सवात' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Aditi Dravid : मनोरंजनसृष्टीत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (National Film Awards 2022) आणि 'बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'कडे (Berlin International Film Festival) प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. नुकतीच या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' आणि 'बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'मध्ये आदिती द्रविडने भारताचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आदितीने रोवला भारताचा झेंडा
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आदितीला 'इजाद' (Ijaad) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नुकतीच 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमात आदिती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळेच आदिती द्रविडने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा रोवला आहे.
सिनेमांना मिळालेल्या यशाबद्दल आदिती म्हणाली, 'इजाद' आणि 'गोष्ट एका पैठणीची' या दोन्ही सिनेमांना यश मिळाल्याचा खूप आनंद आहे. दोन्ही सिनेमांच्या यशाचे श्रेय सिनेमातील संपूर्ण टीमचे आहे. मराठमोळी मुलगी जागतिक पातळीवर भारताचा झेंडा रोवते हे खूप अभिमानास्पद आहे. 'गोष्ट एका पैठणीची' हा माझा पहिलाच सिनेमा आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन."
'इजाद' सिनेमासंदर्भात आदिती म्हणाली," 'इजाद' सिनेमात मी 'अस्मी' हे पात्र साकारलं आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पियुष कुलकर्णीने सांभाळली होती. हिंदी आणि इंग्रजी भाषेत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'अस्मी' हे पात्र साकारणं खूप आव्हानात्मक होतं. अभिनयाची कस लागली होती. 'अस्मी' हे पात्र साकारण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. या सिनेमासाठी खूप अभ्यास करावा लागला होता. आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं ही इच्छा या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे".
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने मिळाली लोकप्रियता
‘माझ्या नवऱ्याची बायको’या मालिकेमुळे अदितीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अदितीने शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती.‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये अदितीनं नंदिनी ही भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या