Nana Patekar : 'वेलकम 3'चा भाग नसल्याने नाना पाटेकर नाराज; म्हणाले,"इंडस्ट्रीत आता..."
Welcome 3 : 'वेलकम 3'चा भाग नसण्याबद्दल नाना पाटेकरांनी (Nana Patekar) भाष्य केलं आहे.
Nana Patekar On Akshay Kumar Welcome 3 : 'वेलकम 3' (Welcome 3) या मल्टी स्टारर सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असली तरी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. 'वेलकम' सिनेमातील नानांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. 'वेलकम' आणि 'वेलकम बॅक' सिनेमात त्यांनी उदय शेट्टीची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली. पण आता 'द वॅक्सिन वॉर' (The Vaccine War) या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान नानांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
'द वॅक्सिन वॉर'च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान नाना पाटेकर यांना 'वेलकम 3' या सिनेमाचा भाग का नाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देत नाना म्हणाले,"त्यांना वाटतं की आता इंडस्ट्रीतमध्ये मी जुना झालो आहे. यामुळेच त्यांनी मला कास्ट केलं नसावं. 'द वॅक्सिन वॉर'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाटतं की अजून मी जुना झालेलो नाही त्यामुळे त्यांनी मला कास्ट केलं आहे".
इंडस्ट्री कोणासाठी थांबत नाही : नाना पाटेकर
नाना पाटेकर पुढे म्हणाले,"इंडस्ट्री कधी कोणासाठी थांबत नाही. तुम्ही जर चांगले काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच संधी देण्यात येते. तुम्हाला स्वत:ला ओळखता आलं पाहिजे आणि तुमचा तुमच्या स्वत:वर विश्वास हवा. प्रत्येक काम करताना तुम्ही 100 टक्के द्यायला हवेत. पण एखादं काम करायचं की नाही हे ठरवण्याचा निर्णय मात्र तुमचा असतो".
'द वॅक्सिन वॉर'च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी नाना पाटेकर यांच्या कामाचं कौतुक केलं. अग्निहोत्री म्हणाले,"नाना पाटेकर कोणत्याही कामाची निवड करण्याआधी खूप विचार अभ्यास करतात, मेहनत घेतात. प्रामाणिकपणे काम करण्यावर त्यांचा भर असतो. 'द वॅक्सिन वॉर' या सिनेमासाठीही त्यांनी खूप मेहनत घेतली आहे".
'वेलकम' या सिनेमाच्या तिसऱ्या भागाचं नाव 'वेलकम टू द जंगल' असे आहे. अहमद खान या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या सिनेमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचा नाना पाटेकर भाग आहेत. पण आता तिसऱ्या भागात ते झळकणार नसल्याने चाहतेही नाराज झाले आहेत.
'वेलकम' या सिनेमाचा पहिला भाग 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनीस बज्मी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर 2015 मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 'मजनू भाई' अनिल कपूर आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.
तगडी स्टारकास्ट असलेला 'वेलकम 3'
'वेलकम 3' या सिनेमात अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्त, परेश रावल, संजय दत्त, जॉनी लिव्हर, तुषार कपूर, अरशद वारसी, श्रेयस तळपदे, मीका सिंह, राजपाल यादव आणि दलेर मेहंदी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
संबंधित बातम्या