(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MUMBA International Short Film Festival : 41 देशातील दर्जेदार लघुपट पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी; मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात पाहता येणार 41 देशातील दर्जेदार लघुपट
MUMBA International Short Film Festival : येत्या 29 आणि 30 सप्टेंबर रोजी पुणे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या ठिकाणी मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या महोत्सवाला सिनेसृष्टीतल्या दिग्गज उपस्थित असणार आहेत. या महोत्सवात सिनेप्रेमींना यु.के, फ्रान्स, इटली, कॅनडा, मेक्सिको, स्विझर्लंड, स्पेन, ग्रीस, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युक्रेन अशा जगभरातील 41 देशातील तसेच भारत देशातून दर्जेदार लघुपटांचा अस्सल खजिन्याचा आनंद लुटता येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक जय भोसले, संयोजक व चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिषेक अवचार (व्यवस्थापिकिय संचालक), अर्जून अजित ( कार्यकारी संचालक) यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात जगभरातील लघुपटकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. या दोन दिवसीय महोत्सवात सिनेसृष्टीतील भूत-वर्तमान-भविष्य काळातील महत्वपूर्ण विषयसंबंधित विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. 29 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन होणार असून एक ते सहा वाजेपर्यंत लघुपट पाहता येणार आहेत तसेच 30 सप्टेंबर रोजी दहा ते चार व चार ते सहा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
प्रथम विजेत्या लघुपटास 21 हजार रुपये रोख रक्कम द्वितीय 11000 रुपये तृतीय सात हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध विभागातील त तंत्रज्ञ आणि कलाकार यांना देखील रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत.
या महोत्सवात लघुपटकारांसाठी फिल्म स्क्रीनिंग, पॅनल डिस्कशन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. भारतात आणि प्रामुख्याने पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात लघुपट संस्कृती विकसित व्हावी, आशयसंपन्न लघुपटाच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे याव्यात, या विचाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेय. अशी माहिती रामकुमार शेडगे यांनी दिली.
सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॅनिमेशनपट, कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या वर्गवारी करण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या महोत्सवात देश विदेशातून सहभागी लघुपटांची एकूण संख्या ७०० हुन अधिक जास्त आहे. यामधून ७० लघुपट दाखवले जाणार आहेत. सदरील महोत्सव विनामूल्य असून प्रथम येणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य दिले जाईल.