Meena Kumari Birth Anniversary : ‘चित्रपटांमध्ये काम करायचे असेल तर....’, केवळ ‘या’ अटींवरच मीना कुमारी यांना मिळाली होती काम करण्याची परवानगी!
Meena Kumari Birthday : बॉलिवूडच्या अजरामर अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतील एका सामान्य कुटुंबात झाला होता.
Meena Kumari Birthday : बॉलिवूडच्या अजरामर अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतील एका सामान्य कुटुंबात झाला होता. अगदी जन्मापासूनच त्यांच्या जगण्याचा संघर्ष सुरु झाला होता. पुढे आयुष्यात त्यांनी अशा दुःखांचा सामना केला की, त्यांना मनोरंजन विश्वात ‘ट्रॅजेडी क्वीन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. इच्छा नसतानाही उदरनिर्वाहासाठी त्यांनी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. मात्र, आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मीना कुमारी यांनी अवघ्या मनोरंजन विश्वावर राज्य केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत यशाचा चढता अन् उतरता असा दोन्ही क्रम पाहिला. लग्नानंतरही त्यांच्या काम करण्यावर अनेक बंधन लादण्यात आली होती. मात्र, सगळ्याला झुगारून त्यांनी एकाकी राहणं पसंत केलं होतं.
अभिनेत्री मीना कुमारी यांच्या वडिलांचे नाव अली बक्श आणि आईचे नाव इकबाल बेगम होते. अली बक्श फाळणीच्या काळात पाकिस्तानातून भारतात आले होते. ते चित्रपटांमध्ये काम करायचे आणि संगीतही शिकवायचे. मीना कुमारी यांच्या आई देखील चित्रपटांमध्ये नृत्य करायच्या. या दोघांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, मीना कुमारी यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्याकडे रुग्णालयात प्रसूतीसाठी पैसेही नव्हते. आपल्याला मुलगा व्हावा असं त्यांना वाटायचं. मुलीचा जन्म झाल्याने तिला अनाथालयात सोडण्याचा विचार त्यांनी केला होता. पण, त्यांनी या मुलीचा सांभाळ केला आणि तिचं नाव ठेवलं महजबीन. याचं महजबीन पुढे मीना कुमारी म्हणून ओळखल्या गेल्या.
कमाल अमरोही-मीना कुमारी यांची प्रेमकहाणी
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी मीना कुमारी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. 1952मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाने मीना कुमारी यांना अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. याच चित्रपटानंतर मीना कुमारी यांनी निर्माते कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले. कमाल यांनी मीना कुमारी यांना ‘अनारकली’त कास्ट केले, पण हा चित्रपट रखडला. त्याचवेळी मीना यांचा अपघातही झाला होता. मीना कुमारी यांच्या प्रेमात बुडालेले कमाल त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात होते, त्यांना प्रेमपत्र लिहित होते. जगापासून लपूनछपून त्यांचे प्रेम फुलत होते.
लग्न ठरले ‘बंधन’!
दोघांनी 14 फेब्रुवारी 1952 रोजी लग्न देखील केले. लग्नानंतर कमाल यांनी मीना कुमारींना चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी दिली, पण सोबतच काही अटी देखील घातल्या होत्या. यामध्ये पहिली अट होती की, मीना यांच्या मेकअप रूममध्ये कोणीही पुरुष प्रवेश करू शकत नाही. त्यांनी दररोज साडेसहाच्या वेळेला घरी परतले पाहिजे. या दरम्यान मीना यांच्यावर पाळत ठेवली जाऊ लागली. ‘साहिब बीबी और गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगला उशीर झाला, तेव्हा मीना यांनी चक्क रडत रडत चित्रीकरण पूर्ण केलं. हा वाद इतका वाढला होता की, प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. एकदा गुलजार मीना यांच्या मेकअप रूममध्ये पोहोचले, तेव्हा कमाल यांचा असिस्टंट बकर अलीने मीना कुमारी यांना सर्वांसमोर थप्पड मारली. मात्र, मीना यांनी तक्रार केली असता कमाल यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
लग्न मोडलं अन्...
मीना कुमारी मनाने खचून गेल्या होत्या. त्यांनी पतीला सोडून बहिणीच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. लग्न मोडल्यावर मीना कुमारी यांना ड्रग्ज आणि झोपेच्या गोळ्यांचे व्यास जडले. अंमली पदार्थांचे व्यसन हे त्यांच्या यकृत सिरोसिस या गंभीर आजाराचे कारण बनले. नंतर मीना कुमारी लोकांपासून दूर एकांतात राहू लागल्या. दरम्यान, मीना यांनी कमाल अमरोही यांच्या ‘पाकीजा’ या चित्रपटात कामही केले. त्यांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्या कोमात गेल्या. याच्या काही दिवसांनंतरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा :
Happy Birthday Mrunal Thakur : छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात, आता बॉलिवूड गाजवतेय मृणाल ठाकूर!