Rakshabandhan 2023 : देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह; तुमच्या लाडक्या मालिकांमध्येही रंगणार 'रक्षाबंधन विशेष' भाग
Marathi Serials : मराठी मालिकांमध्ये 'रक्षाबंधन विशेष' भाग रंगणार आहे.
Marathi Serials Rakshabandhan 2023 : विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका (Marathi Serials) प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. आपल्या मालिकांच्या माध्यमातून नेहमी काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न मालिका करत आहेत. आता मराठी मालिकांमध्येही 'रक्षाबंधन विशेष' भाग पाहायला मिळत आहे.
मालिकांचे विविध विषय असोत वा व्यक्तिरेखेची नवी एन्ट्री, हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आता ज्या मालिका सुरू आहेत त्यांत नेहमीच्याच उत्कंठावर्धक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आता मालिकांत वेगवेगळ्या प्रकारे रक्षाबंधन प्रसंग साजरे केले जाणार आहेत.
'या' मालिकांमध्ये रंगणार 'रक्षाबंधन विशेष' भाग
'तुजं माज सपान' (Tuja Maja Sapan) मालिकेत पैलवान प्राजक्ता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी पुन्हा आपल्या घरी जाणार आहे. तर 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Priteechi Ajab Kahani) या मालिकेत मयूरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयूरीलाच राखी बांधताना पाहायला मिळणार आहे. मयूरी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करते आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घेते आहे. त्यासाठी चक्क भाऊसाहेबच मयूरीला राखी बांधून एक आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करणार आहेत.
'राणी मी होणार' (Rani Me Honar) या मालिकेतही वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या मीरासाठी तिची बहीण मेघ थेट सलूनमध्ये राखी घेऊन पोहोचते. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी झटणाऱ्या मीराला ती राखी बांधणार आहे आणि या बहिणींमधले प्रेम यातून दिसून येणार आहे.
'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' (Chhotya Bayochi Motthi Swapna) या मालिकेतही रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. एवढ्या वर्षांनी आपला भाऊ आरव आणि बहीण इरा यांना भेटल्यावर बयोला आनंद झाला आहे. रक्षाबंधन असल्यामुळे बयो आरवसाठी राखी घेऊन जाते. आता त्यांचे रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे होईल, हे मालिकेत पाहायला मिळेल.
'रमा राघव' या मालिकेत माणूस बदलू शकतो, त्याला योग्य संस्कार आणि संगत याची जोड मिळायला हवी. हा पुरोहितांचा विश्वास रमाने सार्थ ठरवला. याचीच एक पुढची पायरी गाठत रमाने तिची सावत्र बहीण आरुषी सोबत बहीण म्हणून छान नाते फुलवले आहे. या नात्यालाच यंदाच्या रक्षाबंधन सोहळ्यात एक लोभसवाणे वळण मिळणार असून रमाच्या आग्रहातून छोटी बहीण आरुषी, मोठी बहीण रमाला राखी बांधणार आहे. जिथे रमा तिच्या रक्षणाचे वचन देते. अशाप्रकारे रक्षाबंधनाचे आगळेवेगळे प्रसंग या मालिकांतून पाहायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या