Salman Khan : मोठी बातमी! भाईजानच्या शुटींगच्या सेटवर अज्ञात व्यक्तीची घुसखोरी, चौकशी करताच म्हणाला, 'बिश्नोईला सांगू का...'
Salman Khan Security Breach: लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या मिळत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Salman Khan Security Breach: सलमान खानच्या (Salman Khan) शुटींगच्या सेटवर एका अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला.ही व्यक्ती सलमान खानच्या शूटिंगच्या सेटवर बेकायदेशीरपणे घुसली. चौकशी केल्यावर ती व्यक्ती म्हणाली 'मी बिश्नोईला काय सांगू?' संशयित व्यक्तीला चौकशीसाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सलमान खानचा जवळचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची यावर्षी 12 ऑक्टोबरला हत्या झाली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. कारण सलमान खानसोबत जवळचे संबंध असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचं बिश्नोई गँगने सांगितलं आहे. या सुपरस्टारला सरकारकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. त्याच्या घराबाहेरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
धमक्या मिळत असून सलमान सेटवर
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र, धमक्यांना न जुमानता सलमान खानने आपले काम सुरूच ठेवले आहे. याआधी तो त्याच्या बिग बॉस 18 च्या रिॲलिटी शोच्या शूटिंगला कडक सुरक्षेमध्ये परतला असताना, त्याने सिंघम अगेनसाठी एक कॅमिओ देखील शूट केला. यासोबतच सलमान खानने त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटाचे शूटिंगही सुरू ठेवले आहे.
सलमान खानच्या घरावर झाला होता गोळीबार
मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
ही बातमी वाचा :
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?