(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majhi Tujhi Reshimgath : नेहा आणि यश साजरी करणार पहिली वटपौर्णिमा; होणार विशेष भाग
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील नेहा आणि यश नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा-यशचा वटपौर्णिमा हा लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. त्यामुळे नेहा आणि यश पहिली वटपौर्णिमा साजरी करताना दिसणार आहेत.
यश करणार प्रार्थना
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकतंच या मालिकेत यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यांचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजा मस्ती तर प्रेक्षकांनी पाहिलीच सोबत यश आणि नेहाचा लग्न सोहळा डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने संपन्न झाला. या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात प्रेक्षकांना नेहा आणि यश पहिली वटपौर्णिमा साजरी करताना पहायला मिळणार आहेत. या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभुदे अशी प्रार्थना करताना दिसणार आहे.
महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे - वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे ‘सत्यवान आणि सावित्री’ यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आता आवडत्या मालिकांमध्ये वटपौर्णिमा या सणाचा विशेष भागदेखील पाहायला मिळणार आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ'सह या मालिकांचा होणार वटपौर्णिमा विशेष भाग
स्वाभिमान मालिकेतील पल्लवी, आई कुठे काय करते मालिकेतील संजना आणि अनघा, ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू, मुरांबा मालिकेतील रमा, पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी आणि अबोली यंदा पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. या खास सणासाठी सगळ्याच नायिकांनी जय्यत तयारी केली असून या सगळ्यांचा पारंपरिक लूक लक्ष वेधणारा आहे.
संबंधित बातम्या