Vedat Marathe Veer Daudle Saat : महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मृत्यूशी झुंज अपयशी
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Vedat Marathe Veer Daudle Saat Saat : महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पन्हाळा गडाच्या सज्जा कोठी परिसरात 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. दरम्यान सेटवरील घोड्यांची देखभाल करणारा तरुण तटबंदीवरुन कोसळला. गेल्या दहा दिवसांपासून तरुणावर कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपाचारादरम्यान आज पहाटे (28 मार्च) त्याचा मृत्यू झाला आहे.
19 वर्षीय नागेश खोबरे या तरुणाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 19 मार्च 2023 रोजी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ब्रेक सुरू रात्री साडे नऊच्या सुमारास नागेश खोबरे फोनवर बोलता-बोलता तटबंदीकडे गेला. अंधारात त्याला तटबंदीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो कोसळला. तब्बल शंभर फूट खाली दरीत तो कोसळ्याने तो गंभीर जखमी झाला होता.
नागेश खोबरेच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. दरीत कोसळ्यानंतर त्याला दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. नागेश हा 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या सेटवरील घोड्यांची देखभाल करायचं काम करत असे.
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमावर, सिनेमातील कलाकार, त्यांनी साकारलेल्या भूमिकांवर, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'वेडात मराठे वीर दौडले सात'
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेढात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट प्रदर्शना आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील सात कलाकारांच्या भूमिका व त्यांच्या वेशभूषा बाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
खिलाडी कुमार झळकणार शिवरायांच्या भूमिकेत!
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमात सुपस्टार अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रतापरावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे दिसणार आहे. तसेच सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, जय दुधाणे, डॉ.उत्कर्ष शिंदे, नवाब शहा, दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले, हेमल इंगळे हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Vedat Marathe Veer Daudale Saat: महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला, गंभीर जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
