(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kargil Vijay Diwas : भारतीय जवानांची शौर्यगाथा सांगणारे कारगिल युद्धावर आधारीत हे चित्रपट पाहिलेत का?
Kargil Vijay Diwas 2024 : कारगिल युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य, बलिदान यांना अभिवादन करणारे, तरुणाईला प्रेरणा देणारे चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.
Kargil Vijay Diwas Bollywood Movies : अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारली. कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जातो. कारगिल युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य, बलिदान यांना अभिवादन करणारे, तरुणाईला प्रेरणा देणारे चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. या चित्रपटांमध्ये कारगिल युद्ध हा दुवा समान असला तरी त्याचे कथानक वेगवेगळे असल्याचे चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला.
> धूप (Dhoop)
'धूप' हा सिनेमा 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अश्विनी चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. कॅप्टन अनुज नय्यर हे कारगिल युद्धात प्राणांचे बलिदान देतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आलेले अनुभव यावर चित्रपटाची कथा बेतली आहे. या चित्रपटात अभिनेत्री गुल पनांगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ओम पुरी, संजय सुरू, रेवंथी, यशपाल शर्मा आदींच्या भूमिका चित्रपटात आहे.
> लक्ष्य (Lakshay)
'लक्ष्य' हा सिनेमा 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. फरहान अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होते. या सिनेमात ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा कारगिल युद्धातील एका मोहिमेशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आले आहे. जावेद अख्तर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. आयुष्यात कोणतेच ध्येय नसलेला, आळशी, आयुष्याकडे गांभीर्याने न पाहणारा तरुण लष्करात दाखल होतो आणि अतुलनीय पराक्रम दाखवतो. या वनलाईनर भोवती चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, प्रीती झिंटा, राज झुत्शी, आदित्य श्रीवास्तव, ओम पुरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
> एलओसी कारगिल (LOC Kargil)
'एलओसी कारगिल' हा सिनेमा 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जे.पी. दत्ता यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. भारतीय जवानांनी कारगिल युद्धात गाजवलेले शौर्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. वेगवेगळ्या मोहिमांचे यश, जवानांचे बलिदान या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात संजय दत्त, सैफ अली खान, अजय देवगन, अभिषेक बच्चन, नागार्जुन, करीना कपूर, राणी मुखर्जी, रविना टंडन महत्त्वाच्या भूमिकेत होते.
> गुंजन सक्सेना (Gunjan Saxena)
'गुंजन सक्सेना' हा सिनेमा 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा भारतीय हवाई दलाची
अधिकारी असलेल्या गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ या चित्रपटाखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. जान्हवी कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. गुंजन सक्सेना या कारगिल युद्धात सक्रिय होत्या. हवाई दलात पायलट होण्यापासून ते युद्धभूमीवर अनुभव यावर या चित्रपटाची कथा आहे.
> शेरशाह (Shershaah)
'शेरशाह' हा सिनेमा 2021 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा होता. कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिलेले परमवीर चक्र पुरस्कारप्राप्त कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा याने कॅप्टन बत्रा यांची भूमिका साकारली. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. विक्रम बत्रा यांनी भारतीय सैन्यात दाखल होण्यापासून ते कारगिल युद्धातील शौर्य आणि त्यांचे बलिदान यावर चित्रपटाची कथा बेतली आहे.