एक्स्प्लोर
रोमँटिक सिनेमांचा बादशाह करण जोहर 'सैराट' हिंदीत आणणार?
मुंबई : मराठी सिनेक्षेत्रातील लोकप्रियतेचे सर्व विक्रम तोडत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणाऱ्या 'सैराट' सिनेमाचं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतूनही भरभरुन कौतुक झालं होतं. आता हाच 'सैराट' सिनेमा हिंदीतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनने 'सैराट' सिनेमाचे हक्क खरेदी केल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला स्वत: करण जोहरकडून अद्याप दुजोरा मिळाल नसला, तरी हे वृत्त खरं असल्याचं म्हटलं जात आहे.
नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेल्या 'सैराट' सिनेमाने मराठी सिनेक्षेत्रात इतिहास रचला. लोकप्रियता, कौतुक, कमाई या सर्व बाबतीत 'सैराट'ने सर्व विक्रम मोडीत काढले. 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणूनही सैराटची ओळख निर्माण झाली.
महाराष्ट्रासह देशभरात 'सैराट'ने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. मराठीसह हिंदी सिनेक्षेत्रातील दिग्गजांनी या सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. आमीर, सलमान यांच्यासह सुपरस्टार्सनी प्रेक्षकांना स्वत:हून आवाहन करत सिनेमा पाहण्याची विनंतीही केली होती. एकंदरीतच 'सैराट'ने सर्वांनाच भुरळ पाडली.
'सैराट'च्या हिंदी रिमेकमधील कलाकार सर्व नवीन असतील. मात्र, कथानकात काहीही बदल केला जाणार नसल्याचीही माहिती मिळते आहे. पुढल्या वर्षी म्हणजेच 2017 साली या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचीही चर्चा आहे. आता 'परश्या' आणि 'आर्ची'च्या भूमिकेत कोण असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
करण जोहरने 'सैराट'चे हक्क खरेदी केल्याचे वृत्त खरे ठरल्यास लवकरच हा सिनेमा हिंदी भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. झी आणि नागराज मंजुळेंनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement