कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं समन्स, कारण...
कपिलने दिपील छाब्रिया यांना निम्मे पैसेही दिले पण वॅनिटी व्हॅन मिळाली नाही. कपिलकडे याबाबत चौकशी केली जाऊ शकते.
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. कपिल शर्माला कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या डीसी डिझाईन फसवणुकीच्या प्रकरणात जबाब नोंदववण्यासाठी बोलवण्यात आले आहे. आज कपिल शर्मा गुन्हे शाखेसमोर हजर होऊ शकतो. पोलिसांनी याबाबत म्हटलं की, कपिल शर्मा यांनी कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्याविरूद्ध फसवणुकीचा आरोप केला आहे. आता या प्रकरणात कपिल शर्माला साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे.
कपिल शर्माच्या व्हॅनिटी व्हॅनचे प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. कपिल शर्माने शाहरुख खानसारखी वॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी दिलीप छाब्रियांशी संपर्क साधला होता. कपिलने दिपील छाब्रिया यांना निम्मे पैसेही दिले पण वॅनिटी व्हॅन मिळाली नाही. कपिलकडे याबाबत चौकशी केली जाऊ शकते.
दिलीप छाब्रियांवर फसवणुकीच्या गुन्ह्यात कारवाई
मुंबई पोलिसांच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटचे पोलीस अधिकारी सचिन वझे यांना माहिती मिळाली होती की नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ डी सी अवंती गाडी येणार आहे. ज्या गाडीचा नंबर हा बोगस आहे. या माहितीच्या आधारे सचिन वझे आणि त्यांच्या टीमने 17 डिसेंबर रोजी सापळा रचला. मात्र त्या दिवशी गाडी आली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरला ताज हॉटेल कुलाबा या ठिकाणी पुन्हा सापळा रचण्यात आला आणि त्या दिवशी गाडी आली. गाडी ताब्यात घेऊन जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा हादरून टाकणारी माहिती पोलिसांच्या हाती लागली.
गाडी चालवत असलेल्या मालकाची जेव्हा विचारपूस पोलीसांकडून केल्यानंतर गाडी मालकाने गाडीचे पेपर पोलिसांना दिले जे खरे होते. चेन्नईच्या पत्त्यावर रजिस्टर होते. मात्र पुढील तपासात असे निदर्शनास आले की, त्याच चेसिस आणि इंजीन नंबरवर दुसरी गाडी हरियाणामध्ये रजिस्टर करण्यात आली आहे.
डी सी अवंती गाडी ही दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बनवण्यात आली होती. 2016 मध्ये या गाडीची लॉन्चिंग करण्यात आले होते. 2015 मध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांचं क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या गाडीची लॉन्चिंग करण्यात आली होती. दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 14 जून 1993 मध्ये झाली होती. पुण्यात असलेल्या दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांट येथे डीसी अवंती कार बनवल्या जात होत्या.
प्राथमिक तपासामध्ये पोलिसांच्या हाती अतिशय महत्त्वाची माहिती लागली. 120 डीसी अवंती गाड्या या भारतात आणि भारताच्या बाहेर विकल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये एका गाडीची किंमत अंदाजे 42 लाख रुपये आहे. एका गाडीवर एका फायनान्स कंपनीपेक्षा अधिक फायनान्स कंपन्यांकडून लोन घेण्यात आलं आहे. तसेच दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वतः बनवलेल्या गाड्या स्वतः विकत घेतल्या आहेत. 90 गाड्यांवर एक पेक्षा जास्त फायनान्स कंपनी कडून लोन घेण्यात आले आहे.
यामुळे सरकारच्या महसुलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शंका आहे. कस्टम ड्युटी, जीएसटी अशाप्रकारचे काही कार या कंपनीकडून चढवण्यात आले आहेत का आणि त्यांचं प्रमाण किती आहे याचाही तपास क्राइम ब्रांच कडून केले जात आहे.
संबधित बातम्या
दिलीप छाब्रियांच्या 'कार' नाम्याचा पर्दाफाश