Kangana Ranaut On Jaya Bachchan : कंगना रणौतने साधला जया बच्चन यांच्यावर निशाणा, ''त्यांना कधीकधी...''
Kangana Ranaut On Jaya Bachchan : शेतकरी आंदोलनाबाबतही तिने वाद निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. कंगणाने आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.
Kangana Ranaut On Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'एमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट आता 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. मात्र तिची वादग्रस्त वक्तव्ये थांबत नाहीत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर तिने वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तर, दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्यलढा, राजकीय नेते, शेतकरी आंदोलनाबाबतही तिने वाद निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. कंगणाने आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर निशाणा साधला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात जया बच्चन अलीकडे संसदेत खूप चर्चेत होत्या. राज्यसभेच्या सभापतींनी जया यांच्या नावासोबत पती अमिताभ बच्चन यांचे नाव जोडल्याने त्या संतप्त झालेल्या. या रागाच्या भरात त्यांनी काही वक्तव्येही केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत: ला जया अमिताभ बच्चन या नावाने ओळख सांगताना दिसल्या. आपल्या पतीवर आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंगना रणौतने साधला जया बच्चन यांच्यावर निशाणा
कंगना रणौतने 'फिव्हर एफएम'ला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांच्या नावासोबत अमिताभ यांचेही नाव घेतल्याने झालेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. कंगनाने म्हटले की, 'ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. निसर्गाने स्त्री-पुरुष वेगवेगळे निर्माण केले आहेत. त्यांच्यात फरक आहे. पण आजकाल जे घडत आहे ते म्हणजे स्त्रीवादाच्या नावाखाली काही स्त्रिया चुकीच्या दिशेने जात आहेत. आपला समाज अहंकाराकडे वाटचाल करत आहे. जे पूर्णपणे चुकीचे आहे. माझी ओळख कुठेतरी हरवल्याचे लोकांना वाटते. त्यांना पॅनिक अटॅक येतो, असेही कंगनाने म्हटले.
शेतकरी आंदोलनावरही केलं होतं भाष्य...
कंगना रणौतने दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनावर गंभीर आरोप केले होते. तिने म्हटले की, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या. कंगनाच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. तर, भाजपनेही जबाबदारी झटकत कंगनाच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचे म्हटले.