Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Actor Mukesh Khanna On Kalki 2898 AD Movie : छोट्या पडद्यावरील महाभारतात पितामह भीष्मची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी 'कल्की 2898 एडी' चित्रपटावर संताप व्यक्त केला आहे.
Actor Mukesh Khanna On Kalki 2898 AD Movie : नाग अश्विन दिग्दर्शित आणि प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची महत्त्वाची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. मागील आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाइड 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील महाभारतात पितामह भीष्मची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.
मुकेश खन्ना यांनी प्रभास,अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या व्यक्तीरेखेवरही प्रश्न उपस्थित केले. महाभारतातील तथ्यांसोबत छेडछाड करण्यात आली असल्याचे मुकेश खन्ना यांनी सांगितले. मुकेश खन्ना यांनी सर्वप्रथम त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर चित्रपटाचा रिव्ह्यू केला. त्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडीओ यु्ट्युबवर अपलोड केला. आपल्या व्हिडीओत त्यांनी या चित्रपटाबाबत बरेच काही भाष्य केले आहे. प्रभासचा मागील चित्रपट 'आदिपुरुष' पाहिल्यानंतर हिंदू धर्माचे अनुयायी जसे दुखावले होते तसेच या चित्रपटामुळे प्रत्येक सनातनी दुखावला गेला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
महाभारताचा विपर्यास योग्य आहे का?
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये सर्व स्टार कास्ट दिसत आहेत. हे शेअर करताना त्यांनी म्हटले की, या चित्रपटाचे नाव 'कल्की' नसून 'कल की' असायला हवे होते. मुकेश यांनी पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले - कल्कीसारख्या चांगल्या आणि भव्य पद्धतीने बनवलेल्या चित्रपटात आपल्या सोयीसाठी महाभारतातील तथ्यांचा विपर्यास करणे योग्य आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
मुकेश खन्ना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, अर्जुन आणि भीमाने अश्वत्थामाच्या कपाळातून 'रत्न' काढून द्रौपदीला दिले होते. ज्यांच्या पाच पुत्रांना रात्रीच्या अंधारात छावणीत प्रवेश करून अश्वथामाने मारले. तो मणी अश्वथामाकडे कसा आला? या चित्रपटात अशाच अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. या चित्रपट निर्मात्यांकडे असा धाडसीपणा का आहे? त्यांना कोणी का अडवत नाही? असा प्रश्नही मुकेश खन्ना यांनी केला.
अश्वत्थामाला भगवान श्रीकृष्ण असे आदेश कसे देतील?
मुकेश खन्ना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी म्हटले की, 'अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्यात मोठी लढाई झाली होती', तो 'ब्रह्मास्त्र' चालवत होता, परंतु हा हल्ला कसा उलटवावा हे फक्त अर्जुनलाच माहीत होते. म्हणूनच अश्वत्थामाने अर्जुनाविरोधात ब्रह्मास्त्र वापरले नाही. तर, त्याने अभिमन्यूच्या पत्नीवर ब्रह्मास्त्र सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मला समजत नाही की कृष्ण अश्वत्थामाला कल्किच्या रूपाने भविष्यात त्याचे रक्षण करण्याचा आदेश कसा देऊ शकेल? कृष्णासारखा सामर्थ्यवान माणूस अश्वत्थामासारख्या व्यक्तीला आपले रक्षण करण्यास कसे सांगू शकेल असा प्रश्नही मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला. प्रत्येक हिंदूला याचा राग यायला हवा. प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाच्यावेळी जशी नाराजी व्यक्त करण्यास सांगितली. तशीच नाराजी आताही व्यक्त होणे गरजेचे असल्याचे मुकेश खन्ना यांनी सांगितले.