(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन
विजू खोटे यांनी जवळपास 300 सिनेमांमध्ये काम केले. 'शोले' सिनेमातील 'कालिया'ची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळानं दक्षिण मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. विजू खोटे यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजू खोटे यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी आणि हिंदी सिनेमांमधून त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकरल्या. विजू खोटे यांनी जवळपास 300 सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी साकारलेली 'शोले' सिनेमातील 'कालिया'ची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. गब्बर सिंग आणि कालियामधील संवाद आजही लोकांना आहे तसा पाठ आहे. गब्बरच्या 'अब तेरा क्या होगा कालिया?' या प्रश्नावर कालियाने 'मैने आपका नमक खाया है सरदार' असं दिलेलं उत्तर आजही सर्वांना आठवतय.
'अंदाज अपना अपना' सिनेमातील 'रॉबर्ट'ची भूमिकाही अजरामर आहे. याच सिनेमातील 'गलती से मिस्टेक होगया' डायलॉगही प्रचंड गाजला. विजू खोटे यांनी 'अशी ही बनवाबनवी', 'आयत्या बिळावर नागोबा' अशा अनेक प्रसिद्ध मराठी सिनेमांमध्येही छोट्या मात्र सदैव लक्षात राहतील अशा महत्त्वाच्या भूमिका केल्या.