Jeta Trailer: 'जेता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 25 नोव्हेंबर रोजी चित्रपट होणार रिलीज
नुकताच 'जेता'चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
![Jeta Trailer: 'जेता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 25 नोव्हेंबर रोजी चित्रपट होणार रिलीज Jeta Trailer release movie will release on 25 november Nitish Chavan movie Jeta Trailer: 'जेता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 25 नोव्हेंबर रोजी चित्रपट होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/40d3bacbf292887ae406ee59ba1ddd591668672129417259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
संजू एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी सहनिर्माते मिहीर संजय यादव यांच्या साथीने 'जेता' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांनी सांभाळली आहे. संजय लक्ष्मणराव यादव यांनी कथा लिहिली असून, योगेश सबनीस आणि योगेश साहेबराव महाजन यांच्या साथीने त्यांनी पटकथाही लिहीली आहे. चित्रपटाची तोंडओळख करून देणारा आणि चित्रपटात काय पहायला मिळणार याची झलक दाखवणारा असा 'जेता'चा ट्रेलर आहे. या चित्रपटात नेमकी कोणत्या प्रकारच्या जेत्याची कथा पहायला मिळणार याचा अंदाज ट्रेलर पाहिल्यावर येतो. जिद्द, चिकाटी, मेहनत, त्याग, प्रेम आणि विजयाची गोष्ट या चित्रपटात आहे. कॅालेजवयीन जीवनाच्या साथीला एक अवखळ प्रेमकथाही आहे. दर्जेदार नीतीमूल्यांच्या जोडीला लक्षवेधी सादरीकरणही आहे. 'नाद आणि माज नाही करायचा' यांसारख्या दमदार संवांदासोबत सुमधूर गीत-संगीतही आहे. एका जिद्दी तरुणाच्या जिद्दीची विजयगाथाच या चित्रपटात आहे. याबाबत दिग्दर्शक योगेश महाजन म्हणाले की, आजच्या युगातील कथा सादर करताना 'जेता'ला प्रेमकथाची गुलाबी किनारही जोडण्यात आली आहे. अर्थपूर्ण संवाद आणि कसदार अभिनय हा या चित्रपटाचा मोठा प्लस पॅाईंट असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. यातील अर्थपूर्ण गीतरचना आणि सुरेल संगीतरचना कथेच्या प्रवाहात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आहेत. नीतिश चव्हाण आणि स्नेहल देशमुख या नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आकर्षित करेल अशी भावना निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी व्यक्त केली.
पाहा ट्रेलर:
'जेता'चे संवादलेखन योगेश सबनीस आणि संजय लक्ष्मणराव यादव यांनी केलं आहे. नीतिश आणि स्नेहल या जोडीसोबत चित्रपटामध्ये शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे, कुणाल मेश्राम, दीपक टावरे, प्रवीण इंदू, गौतम शिरसाठ, श्रेया कुलकर्णी आदी मातब्बर कलाकारही दिसणार आहेत. ह्या चित्रपटातील श्रवणीय गाण्यांना कबीर शाक्य यांनी संगीतबद्ध केले आहे. डिओपी अनिकेत के. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, हर्षद वैती यांनी संकलन केलं आहे. साहस दृश्य शंकर पटेकर यांनी केले असून, नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारी नाॅडी रसाळ ने सांभाळली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)