Jeevacha Raan In Matdan : राजकारणातील पडद्यामागचे चेहरे दाखवणार 'जीवाचं रान इन मतदान'; विजू मानेंची नवी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Viju Mane : दिग्दर्शक विजू माने यांची 'जीवाचं रान इन मतदान' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Jeevacha Raan In Matdan : सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, मध्यावर्ती निवडणुका या आता होतील की नंतर होतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. या निवडणुका आज उद्या होतीलच, पण निवडणुका म्हटलं की प्रचार आला आणि तो प्रचार यशस्वीपणे करण्यासाठी लागणारी यंत्रणा. निवडणुकांचा इतका प्रभावी प्रचार कसा केला जातो, कोण असतं या सगळ्यामागे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल! या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) घेऊन येत आहेत एक मुलाखतींची मालिका. 'जीवाचं रान इन मतदान'(Jeevacha Raan In Matdan) असे या वेब सीरिजचे नाव आहे.
विजू माने करणार बातचित
'जीवाचं रान इन मतदान' या मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना राजकीय पक्षांसाठी पडद्यामागे राबून निवडणुकांच्या घोषणा, प्रचारगीते, संगीत, व्हिडीओज, मोठमोठ्या सभा या सगळ्या गोष्टी करणाऱ्या मंडळींना जाणून घेता येणार आहे. या मान्यवरांसोबत विजू माने बातचित करताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
उदय सबनीस, अवधूत गुप्ते अशा मान्यवरांचाही 'जीवाचं रान इन मतदान' या वेबसीरिजमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. नुकताच या सिरीजचा लोगो आणि विजू मानेंनी लिहिलेलं, अभिनेते कुशल बद्रिकेने गायलेलं थीम सॉंग रिलीज झालं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही वेब सीरिज प्रेक्षकांना 15 जुलैपासून 'लाईट अॅन्ड शेड' आणि 'सलाम ठाणे ' या युट्युब चॅनलवर पाहायला मिळणार आहे.
जीवाचं रान इन मतदान
कधी होणार रिलीज? 15 जुलै
कुठे पाहायला मिळेल? 'लाईट अॅन्ड शेड' आणि 'सलाम ठाणे' युट्युब चॅनलवर