(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पीएम नरेंद्र मोदी'च्या पोस्टरवर नाव पाहून आश्चर्याचा धक्का बसला : जावेद अख्तर
बालपासून पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. बोमन इराणी, झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन या कलाकारांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे.
मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे पोस्टर पाहून गीतकार जावेद अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या क्रेडिट लाईनमध्ये जावेद अख्तर यांचं नाव पाहून त्यांना धक्का बसला आहे.
'पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात जावेद अख्तर यांनी एकही गाणं किंवा संवाद लिहिलेला नाही. तरीही क्रेडिट लाईनमध्ये जावेद अख्तर यांच नाव आहे. ट्वीट करुन जावेद अख्तर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. "मला या चित्रपटाच्या पोस्टरवर माझं नाव पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी या सिनेमासाठी एकही गाणं लिहिलेलं नाही", असं ट्वीट जावेद अख्तर यांनी केलं आहे.
Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 22, 2019
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे. बालपासून पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. बोमन इराणी, झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन या कलाकारांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे.
रबजीत, मेरी कोम यांसारख्या बायोपिकचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर संदीप सिंह सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच सुरेश ओबेरॉय देखील निर्मित्यांपैकी एक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच म्हणजेच 5 एप्रिलला हा चित्रपट थिएटरमध्ये झळकेल.