Girish Oak: 'तुम्ही खूप शांत संयमी होता...'; वडिलांच्या निधनानंतर अभिनेते गिरीश ओक यांची भावूक पोस्ट
नुकतीच गिरीश ओक (Girish Oak) यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करुन त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
![Girish Oak: 'तुम्ही खूप शांत संयमी होता...'; वडिलांच्या निधनानंतर अभिनेते गिरीश ओक यांची भावूक पोस्ट Girish Oak father ratnakar dinkar oak passed away Girish Oak share post Girish Oak: 'तुम्ही खूप शांत संयमी होता...'; वडिलांच्या निधनानंतर अभिनेते गिरीश ओक यांची भावूक पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/c584f47025ba4f0d9b1ede9beff5309f1692863877553259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Girish Oak: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी रत्नाकर ओक यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच गिरीश ओक यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करुन रत्नाकर ओक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गिरीश ओक यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गिरीश यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गिरीश ओक यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'काल माझे बाबा ती. रत्नाकर दिनकर ओक ह्यांचं वयाच्या 93 व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात तसेच तेही माझे होतेच. माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजीनीअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजीनीअर ह्या पदावर ते 1989 साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही. ह्या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश गुजराथी उर्दू इतक्या भाषा यायच्या ते शिवण काम आणि स्वयंपाक उत्तम करायचे कपड्यांना इस्त्री सायकल स्कूटर घड्याळं घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो. माझी आई गमतीनी म्हणायची ती,मी आणि बहीण ह्यांना नटबोल्ट नाहीत नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं.अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं. ते बासरी आणि माउथ ॲार्गन छान वाजवायचे ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला पण मीच कंटाळा केला. रोज नियमीत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो.अन्नाची पाण्याची विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे ह्या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळली. काय काय आणि किती सांगू. आखीर बाप बाप होता है और बेटा बेटा.
पुढे पोस्टमध्ये गिरीश ओक यांनी पोस्टमध्ये लिहिलं,'बाबा तूम्ही खूप सकारात्मक व्यासंगी आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणालाही त्रास न देता शांतपणे गेलात. मला आणि सौ. पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्हाला सतत वेगवेगळ्या कामात व्यस्त असणं आवडायचं देव तुम्हाला तसंच व्यस्त ठेवो म्हणजे तुम्ही आनंदी रहाल. बाबा शिरसाष्टांग नमस्कार'
अग्गंबाई सासूबाई, जुळून येती रेशीमगाठी,अग्गंबाई सूनबाई, पिंजरा या मालिकांमध्ये गिरीश ओक यांनी काम केलं. तसेच भाऊ माझा पाठी राखा,तानी,खेळ सात बराच या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)