(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sayali Sanjeev : वडिलांच्या आजारपणात बाप्पाकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली; अभिनेत्री सायली संजीवच्या पाठीशी गणराया
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा बाप्पा' या सेगमेंटच्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि बाप्पाचं नातं कसं आहे...
Sayali Sanjeev On Kalavantancha Ganesh : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र या उत्सावाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच मंडळी सज्ज आहेत. मग सेलिब्रिटी तरी यात कसे मागे पडतील. तुमची लाडकी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि बाप्पाचंही (Ganapati Bappa) खास नातं आहे.
बाप्पाबद्दल एबीपी माझाशी बोलताना सायली संजीव (Sayali Sanjeev On Ganapati Bappa) म्हणाली,"गणपती बाप्पा आणि माझं नातं मैत्रीचं आहे, भावडांचं आहे. एकंदरीतच बाप्पामध्ये मी सर्व नाती एकत्र पाहते. आमच्या घरी सात दिवसांचा बाप्पा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहेत. आमच्या गौरी-गणपती दोन्ही असतात. गौरींचे मुखवटेच आमच्याकडे 150 वर्षे जुने आहेत".
बाप्पा माझ्या पाठीशी आहे : सायली संजीव
सायली म्हणते,"बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला कायमच वाटतं. वडिलांच्या आजारपणात बाप्पाकडून खूप सकारात्मक उर्जा मिळाली असं वाटतं. आठ वर्षांपूर्वी मी स्वत: बाप्पा बसवायला लागले ही माझ्यासाठी कायम आठवणीत राहणारी गोष्ट आहे. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मुली गणपती बसवत नाही, असं आपल्याकडे म्हणतात. पण मी नऊवारी साडी, आणि साजश्रृंगार करुन बाप्पा बसवते".
View this post on Instagram
सायली पुढे म्हणाली,"बाप्पाची सजावट साधी आणि आकर्षक करायला मला आवडतं. खूप सजावट करत नाही. दरवर्षीप्रमाणे पडद्यावर लिहिलेले श्लोक आहेत. यंदाही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असेल. प्लास्टिक सारख्या गोष्टींचा वापर न करता इको फ्रेंडली पर्यावरणपूरक सजावट करण्यावर माझा भर असेल".
सायली संजीवबद्दल जाणून घ्या...
सायली संजीव (Sayali Sanjeev) ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिका, नाटकं आणि सिनेमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'काहे दिया परदेस' ही तिची मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'मन फकिरा', 'झिम्मा' 'गोष्ट एका पैठणीची' हे तिचे सिनेमेही चांगलेच गाजले आहेत. 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आता तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या