Ekda Kay Zala : 'एकदा काय झालं' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; सुमीत राघवन मुख्य भूमिकेत
Ekda Kay Zala : डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ekda Kay Zala : ‘एकदा काय झालं’ हे वाक्य सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून कोणानाकोणाकडून ऐकतो. अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला ‘एकदा काय झालं’ (Ekda Kay Zala) हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं’ हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन सिनेमा दिग्दर्शित करणे ही डॉ. सलील कुलकर्णी यांची खासियत आहे. त्यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. यानंतर पुन्हा एकदा डॉ. सलील कुलकर्णी एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्यास सज्ज आहेत.
‘एकदा काय झालं’ या सिनेमाची घोषणा त्यांनी कोरोनापूर्वीच केली होती. मात्र आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 5 ऑगस्टला हा बहुप्रतिक्षीत सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमाची आणखी एक विशेष बाब म्हणजे, अभिनेता सुमीत राघवन हा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'एकदा काय झालं'च्या मोशन पोस्टरमध्ये गोष्टींची अनेक पुस्तकं दिसत आहेत. तसेच सुमीत राघवनसह मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री या दिग्गज कलाकारांसोबत बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार हे स्पष्ट होत आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या सिनेमाला लाभले आहे.
5 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज
‘एकदा काय झालं!!’ हा सिनेमा पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत करत आहेत. तर या सिनेमाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दाते, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सुमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे. हा सिनेमा 5 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या