(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Drishyam : अजयच्या 'दृश्यम'चा कोरिअन भाषेत होणार रिमेक; 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'दरम्यान घोषणा
Drishyam : अजय देवगण आणि तब्बूच्या 'दृश्यम' सिनेमाचा आता कोरिअन भाषेत रिमेक होणार आहे.
Drishyam Franchise Remake In Korea : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा (Tabu) बहुचर्चित 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'दृश्यम'च्या हिंदी रिमेकने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या सिनेमाचा कोरिअन (Korea) भाषेत रिमेक होणार आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'दरम्यान (Cannes Film Festival 2023) ही घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय प्रॉडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अॅंथॉलॉजी स्टुडिओने 'कान्स 2023' (Cannes Film Festival 2023) चित्रपट महोत्सवादरम्यान भागीदारीची घोषणा केली. दरम्यान निर्माते कुमार मंगत पाठक आणि जय चोई उपस्थित होते. 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमाचा कोरिअन भाषेत होणारा रिमेक हा या भागीदारीचा सर्वात मोठा परिणाम आहे.
हिंदी सिनेमाची दखल जगभरात घेतली जाईल : कुमार मंगत पाठक
'दृश्यम'च्या कोरिअन रिमेकबद्दल बोलताना कुमार मंगत पाठक म्हणाले की,"दृश्यम'चा रिमेक कोरियामध्ये बनत असल्यामुळे मी आनंदी आहे. यामुळे भारताबाहेर त्याचा आवाका वाढेल. तसेच हिंदी सिनेमाचीदेखील जगभरात दखल घेतली जाईल. एवढी वर्षे आपण कोरिअन सिनेमे पाहूण प्रेरणा घेतली. भारतीय सिनेसृष्टीसाठी यापेक्षा मोठी अभिमानास्पद बाब काय असू शकतो".
आंतरराष्ट्रीय भाषेत 'दृश्यम'चा रिमेक (Drishyam Remake) बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 'शीप विदाऊट अ शेफर्ड' या नावाने चायनीजमध्ये याचा रिमेक करण्यात आला होता. आता कोरिअन भाषेत हा सिनेमा पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'दृश्यम'च्या (Drishyam) पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केलं आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाचं कथानक विजय साळगावकर या पात्राभोवती फिरणारं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आजही प्रेक्षक हा सिनेमा आवडीने पाहतात.
'दृश्यम 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला... (Drishyam 3 Release Soon)
अजयचे 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' (Drishyam 2) हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले होते. आता लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा भाग मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अजय आणि मोहनलाल एकत्र झळकणार आहेत. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या