'दिल बेचारा' आज रिलीज होणार, सिनेमाच्या शेवटी सुशांतला अनोखी आदरांजली
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट आज डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या शेवटी सुशांतला अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता जवळपास महिना उलटला आहे. या घटनेच्या महिन्याभरानंतर त्याची भूमिका असलेला 'दिल बेचारा' हा चित्रपट आज (24 जुलै) रिलीज होणार आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता डिस्ने हॉटस्टारवर त्याचा सिनेमा रिलीज होईल. यापेक्षा नवी बाब अशी की चित्रपटाच्या शेवटी अभिनेता सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
मुकेश छाब्रा दिग्दर्शित या चित्रपटची सध्या जोरदार चर्चा आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट असल्यामुळे या सिनेमाकडे सिनेप्रेमी सहानुभूतीने पाहत आहेत. कारण सुशांत गेल्यानंतर या चित्रपटाची घोषणा झाली. त्याची तारीख जाहीर झाली. यापूर्वी अनेकदा त्याचं प्रदर्शन काही कारणाने पुढे ढकलण्यात आलं होतं. सुशांत गेल्यानंतर अनेक स्तरातून हळहळ व्यक्त झाली. कुणी शब्दातून व्यक्त झालं. तर कुणी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून. संगीतकार ए आर रेहमानही यात मागे नव्हता. ए. आर. रेहमानने नुकतंच एक गाणं बनवलं आहे. 'दिल बेचारा'च्या निमित्ताने त्याचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलं. ते गाणं आता सिनेमाच्या एंड स्क्रोलला म्हणजे सिनेमाच्या शेवटी टायटल्स येतात त्यावेळी लावलं जाणार आहे. सुशांतला ती एकप्रकारे आदरांजली असेल.
याबाबतची माहिती 'दिल बेचारा'च्या टीमनेच दिली आहे. अर्थात ते सरप्राईज ठेवण्यात आलं आहे. सिनेमा पाहून झाल्यानंतर रसिकांना ते गाणं पाहता येईल. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा सिनेमा ओटीटीवर येणार असल्याने सिनेप्रेमींना आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर हे गाणं पाहता येईल. या सिनेमात संजना संघीची मुख्य भूमिका असून हॉलिवूडचा 2014 चा चित्रपट 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या सिनेमाचा तो रिमेक असेल.
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्र्यातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. सिनेविश्वातच नाही तर सर्वच स्तरातून हळहळही व्यक्त करण्यात आली होती. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत जवळपास अनेकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साली, यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांचाही समावेश आहे.
संबंधित बातम्या
सुशांतचा 'दिल बेचारा' उद्या रिलीज... शुक्रवारी संध्याकाळी प्रिमिअर!
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?
आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट
काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल






















