Dharmaveer : 'जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर करायचं नाही'; आनंद दिघे यांच्या जीवनपटाला एक वर्ष पूर्ण! प्रेक्षकांना आता 'धर्मवीर 2'ची प्रतीक्षा
Dharmaveer : आनंद दिघे यांच्या 'धर्मवीर' या सिनेमाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे.
Dharmaveer Marathi Movie Latest Update : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) हा सिनेमा आजही चर्चेत आहे. एका वर्षापूर्वी या सिनेमाचे 400 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर 10,000 हून अधिक शोज लागले होते. आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे.
'धर्मवीर' सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला : एकनाथ शिंदे
'धर्मवीर'ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सिनेमाला लाभलेले उत्तुंग यश तसेच वर्षपूर्तीनिमित्त सर्वप्रथम वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन".
दिघे साहेब असेच कायम पाठीशी रहा : प्रसाद ओक
'धर्मवीर' सिनेमातील आनंद दिघे यांची भूमिका साकारतानाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओकने लिहिलं आहे,"धर्मवीर माझ्या आयुष्यातला या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या भूमिकेने आणि सिनेमाने मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रवीण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मन:पूर्वक आभार. 'धर्मवीर 2'ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरुन मिळेल, अशी आशा करतो. दिघे साहेब असेच कायम पाठीशी रहा".
'धर्मवीर' या सिनेमचा निर्माता मंगेश देसाईनेदेखील खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे,"मागच्या वर्षी याच दिवशी म्हणजे 13 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, राज्याबाहेर आणि परदेशात 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. धर्मवीर आनंद दिघेंचा चरित्रपट त्यांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने सुपरहिट झाला. आज त्याची वर्षपूर्ती. याहीपुढे चांगल्या कलाकृतींची निर्मिती आम्ही करत राहू. तुमचं सहकार्य असू द्या".
प्रविण तरडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला 'धर्मवीर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी 'धर्मवीर 2'ची घोषणा करण्यात आली असून 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
संबंधित बातम्या