Kapil Sharma बनला फूड डिलिव्हरी रायडर , चाहत्याने शेअर केलेल्या फोटोवर कपिल म्हणाला...
एका चाहत्याने ट्विटरवर कपिल शर्माचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कपिल शर्मा फूड डिलिव्हरी रायडरच्या वेशात दिसत आहे. हा फोटो रिशेअर करताना कपिलने म्हटलं की, "कोणाला सांगू नको."
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या भुवनेश्वरच्या रस्त्यांवर फूड डिलिव्हरी रायडर बनून फिरत आहे. त्यातच चाहत्यांना त्याला लाईव्ह पाहता येत आहे. कपिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटात फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका साकारत आहे. याचं चित्रीकरण सुरु झालं आहे. चित्रपटातील कपिलच्या लूकचा फोटो आता व्हायरल झाला आहे.
एका चाहत्याने ट्विटरवर कपिल शर्माचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कपिल शर्मा फूड डिलिव्हरी रायडरच्या वेशात दिसत आहे. ऑरेज टी शर्ट परिधान केलेला कपिल शर्मा बाईकवर बसलेला आहे. त्याच्या पाठीवर मोठी बॅग आहे. सोबतच डोक्यात निळ्या रंगाचं हेल्मेट आहे. सिग्नलवर अनेक गाड्यांच्या गराड्यात कपिल आपली बाईक घेऊन उभा आहे.
फोटो शेअर करताना चाहत्याने लिहिलं आहे की, "सर जी मी आज तुम्हाला लाईव्ह पाहिलं." हा फोटो रिशेअर करताना कपिलने म्हटलं की, "कोणाला सांगू नको." या फोटोमध्ये सगळ्यांच्या नजरा कपिल शर्मावरच आहेत. कपिल बाईकच्या गराड्यात असून सगळे त्यालाच पाहत आहेत. तर कपिल शर्मा आपल्याच विचारात मग्न असल्याचं दिसतं.
Kisi ko batana mat 🤓 https://t.co/3rCAjuPKva
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) March 18, 2022
कपिल शर्माच्या या फोटो मजेशीर कमेंट्सही आल्या आहे. अनेकांना कपिल शर्माला ओळखता आलं नाही. एका युझरने लिहिलं आहे की, "मी फोटोमध्ये कपिलला शोधत होतो, स्विगीवाला माणूस कपिल निघाला." दुसऱ्या युझरने लिहिलं आहे की, "दुसरं काम शोधलं का सर?" तर आणखी एका युझरने म्हटलं की, पार्ट टाईम जॉब करताना कपिल पाजी."
दरम्यान काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा आणि दिग्दर्शक नंदिता दास यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. कपिलने भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
नंदिता दासच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या चित्रपटाच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. कपिल शर्मा या चित्रपटात फूड डिलिव्हरी रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे. शहाना गोस्वामी ही अभिनेत्री कपिल शर्मासोबत प्रमुख भूमिकेत दिसेल. ती त्याच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे.