Dhamaka : अभिनेता कार्तिक आर्यनचा 'धमाका', 10 दिवसांत झाला कोट्यधीश
एकीकडे हातातून काही चित्रपट काढून घेतले जात असताना 'धमाका' (Dhamaka) या चित्रपटाने अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) कोट्यधीश केलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन सतत चर्चेत आहे. एक अभिनेता म्हणून त्याने आपलं कसब सिद्ध केलं आहेच. पण काही दिवसांपासून त्याची तुलना सुशांतसिंह राजपूतसोबत होऊ लागली आहे. याचं कारण, त्याच्याकडून वारंवार जाणारे सिनेमे. काही दिवसांपूर्वी करण जोहर बनवत असलेल्या 'दोस्ताना 2' मधून त्याला काढण्यात आलं. त्यानंतर आनंद एल राय यांच्या सिनेमातूनही त्याला वगळण्यात आलं. अशा गोष्टी घडू लागल्यानंतर कार्तिक आर्यन दुसरा सुशांतसिंह राजपूत होतोय का या चर्चेला जोर आला.
कार्तिक आर्यनला कोणीच गॉडफादर नाही. तोही असाच आऊटसायडर. आपलं करिअर सोडून तो बॉलिवूडमध्ये आला. 'लव्ह आज कल 2' मधून त्याला मोठा ब्रेक मिळाला. त्याच्या कामाचं कौतुकही झालं. अलिकडे कार्तिकने अलिशान गाडीही घेतली. असं सगळं चालू असताना कार्तिक अनेक सिनेमातून वगळला जाऊ लागला. त्याला आपण क्रिएटिव डिफरन्सेस म्हणतो त्याचं कारण पुढे करण्यात आलं. पण तसं खरंच असेल असं वाटत नाही. कारण, कार्तिकला एक भली मोठी रक्कम मिळालेली आहे. त्याचं कारण, त्याने केलेला 'धमाका' हा चित्रपट.
'धमाका' हा आजवरचा बॉलिवूडमध्ये सर्वात जलदगतीने तयार झालेला चित्रपट असल्याचं मानलं जातं आहे. कारण 'धमाका' हा चित्रपट तयार झाला तो केवळ 10 दिवसांत. कार्तिक आर्यनने जेव्हा 'दोस्ताना 2' स्वीकारला तेव्हाच, त्याला 'धमाका' आला होता. जो त्याने स्वीकारला. बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या चर्चेनुसार या 10 दिवसांसाठी कार्तिकला मिळालेलं मानधन काही कोटीत आहे. केवळ 10 दिवसांत इतकी रक्कम मिळवलेले जे मोजके कलाकार आहेत त्या यादीत आता कार्तिक जाऊन बसला आहे. कार्तिकने 'धमाका' फिल्म स्विकारली आणि त्याला ही रक्कम एकाचवेळी अदा झाल्याचंही कळतं. धमाकामध्ये असलेल्या भूमिकेसाठी कार्तिकला मिळालेली रक्कम आहे तब्बल 18 कोटी रुपये. या 18 कोटीभवती सगळी चर्चा रंगू लागली आहे. काही ट्रेड एनालिस्ट यांनीही ही गोष्ट ऑफ द रेकॉर्ड मान्य केली आहे. पण याला कोणताही अधिकृत पुरावा अद्याप नाही. कार्तिकचं काम पाहून निर्मात्यांनी त्याला ही रक्कम देऊ केली आहे.
कार्तिककडे पुन्हा एकदा काम येऊ लागलं आहे. सध्या तो रोहित धवन यांच्या 'शेहजादा' या सिनेमातही काम करतो आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेते परेश रावलही काम करणार आहेत. सिनेमाचं चित्रिकरण आता सुरू होईल. पुढच्या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
महत्वाच्या बातम्या :
- पवारांकडून अनलॉक, ठाकरेंकडून लॉक; म्हाडाने कॅन्सरग्रस्तांना दिलेल्या 100 खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
- Bitcoin : चीनचा दे धक्का! बिटकॉईनने पाच महिन्यातील नीचांक पातळी गाठली, किंमती 22 लाखांवर घसरल्या
- Delta Plus : डेल्टा प्लस व्हेरिएंट 'चिंताजनक' घोषित, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र सरकारचा अलर्ट