Bollywood Actress : "त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Manisha Rani : बॉलिवूड अभिनेत्री मनीषा रानीला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव आला आहे. अभिनेत्रीने नुकतचं एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. एका व्यक्तीने 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) नावावर अभिनेत्रीला फोन केला होता आणि मध्यरात्री 3 वाजता भेटायला बोलावलं होतं.
Manisha Rani : 'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाची उपविजेती मनीषा रानी (Manisha Rani) नेहमीच आपल्या नटखट अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. मनीषाने 'बिग बॉस'ची (Bigg Boss) ट्रॉफी आपल्या नावे केली नसली तरी कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर तिने आपलं नाव कोरलं आहे. अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतचं आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर भाष्य केलं आहे. करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. करिअरच्या सुरुवातीला मनीषाला एका व्यक्तीने 'बिग बॉस'मध्ये जाण्याची संधी देतो असं सांगून मध्यरात्री 3 वाजता भेटायला बोलावलं होतं.
मनीषाने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
'गलाट्टा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत मनीषा रानीने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवावर भाष्य केलं आहे. 'बिग बॉस' या लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमात सहभागी होण्याचं मनीषाचं नेहमीच स्वप्न होतं. सलमान खानच्या (Salman Khan) या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी ती प्रयत्न करत होती. दरम्यान एक व्यक्ती तिच्या संपर्कात आला. तो 'बिग बॉस'च्या टीमचा भाग आहे, असं त्याने तिला सांगितलं होतं. सुरुवातीला मनीषाने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. त्याच्यासोबत तिने आपला नंबरदेखील शेअर केला. तिने त्याच्यासोबत काही डान्स व्हिडीओदेखील शेअर केले. अभिनेत्री म्हणाली की, त्या व्यक्तीने तिला 'बिग बॉस'मध्ये पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं.
'झलक दिखला जा 11'ची विजेती पुढे म्हणाली की,"कर्मभूमी मुंबई असली तरी माझं गाव बिहार आहे. मी 4-5 दिवसांसाठी बिहारला माझ्या घरी गेले होते. त्यावेळी त्या व्यक्तीचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला,तुला बिग बॉस करायचं नाही का? घरी काय गेलीस, मुंबईत ये लगेचच". त्यानंतर मी लगेचच स्पेशल तिकीट काढलं आणि मुंबई गाठली".
रात्री 3 वाजता त्याने कॉल केला...
मनीषा पुढे म्हणाली की,"तो व्यक्ती मला वेगवेगळ्या जागेवर भेटायला बोलावायचा. त्यामुळे मला थोडा संशय आला. एकदा तर त्याने मला मध्यरात्री 3 वाजता फोन करुन त्याच्या घरी भेटायला बोलावलं होतं. त्यानंतर तो संबंधित व्यक्ती खूप ओरडला आणि त्याने शिव्यादेखील दिल्या. तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं होतं. अश्रू अनावर झाले होते. पुढे मी त्याला ब्लॉक केलं". मनीषाप्रमाणे अनेक अभिनेत्रींना आजवर कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव आलेला आहे.
संबंधित बातम्या