Bhiwandi : जिमचं उद्घाटन करु न देताच पोलिसांनी अभिनेता साहिल खानला परत पाठवलं!
भिवंडीतील एका जिमच्या उद्घाटनासाठी अभिनेता साहिल खानला बोलवलं होतं. परंतु चाहत्यांची तुफान गर्दी झाल्याने पोलिसांनी जिमचं उद्घाटन करु न देताच साहिल खानला रस्त्यावरुनच माघारी परत पाठवलं.
![Bhiwandi : जिमचं उद्घाटन करु न देताच पोलिसांनी अभिनेता साहिल खानला परत पाठवलं! Bhiwandi News Police sent actor Sahil Khan back without allowing him to inaugurate the gym Bhiwandi : जिमचं उद्घाटन करु न देताच पोलिसांनी अभिनेता साहिल खानला परत पाठवलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/03/b907f1f62924270b10d8d26155b20b2b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भिवंडी : भिवंडी शहरातील मिल्लतनगर परिसरात फिटनेस जिमच्या उद्घाटनासाठी बॉडी बिल्डर आणि अभिनेता साहिल खान येणार असल्याने परिसरात चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चाहत्यांची तुफान गर्दी झाल्याने पोलिसांनी जिमचं उद्घाटन करु न देताच अभिनेता साहिल खानला रस्त्यावरुनच परत पाठवलं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
मिल्लतनगरमधील एका जिमच्या उद्घाटनासाठी साहिल खानला निमंत्रण देण्यात आलं होतं. साहिल खान येणार असल्याचं समजताच तिथे मोठी गर्दी झाली. भिवंडी शहरात तसेच चाविंद्रा रोड या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. इतकंच नाहीतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला. गर्दी कशी कमी करता येईल यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. अखेर जिमचं उद्घाटन न करताच पोलिसांनी साहिल खानला माघारी परत पाठवलं.
दुसरीकडे, पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी फोनवरुन दिलेल्या माहितीनुसार, "या ठिकाणी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती." "विनाकारण मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने कारवाई करण्यात येणार आहे," असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा या परिसरात तैनात केला आहे.
साहिल खान : अभिनेता म्हणून फ्लॉप पण वैयक्तिक कारणांनी चर्चेत
उत्तम शरीरयष्टी आणि चांगले लूक्स असूनही साहिल खानला बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून आपली विशेष ओळख निर्माण करता आली नाही. परंतु तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे कायम चर्चेत असतो. 2001 मध्ये स्टाईल चित्रपटाद्वारे त्याने सिनेकारकीर्दीची सुरुवात केली होती. या सिनेमात त्याच्यासोबत शर्मन जोशी होता. यानंतर साहिल खानने एस्क्युझ मी, ये है जिंदगी, डबल क्लास आणि अलादिनसह एकूण सात चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी विशेष कमाल केली नाही. त्याने 2004 मध्ये अभिनेत्री निगार खानसोबत लग्न केलं. परंतु ते फार काळ टिकलं नाही आणि एका वर्षाने त्यांनी घटस्फोट घेतला. तसंच साहिल खान गे असून पत्नीने त्याला एका पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने दोघांचा घटस्फोट झाल्याचा दावाही करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)