BMW असो वा पहिली व्हॅनिटी, प्रत्येक नव्या गाडीचं स्टिअरिंग वडिलांच्या हाती, भरत जाधव माझा कट्टावर भरभरुन बोलला!
Bharat Jadhav on Majha Katta : 'अधांतर' या नाटकानंतर आता 'अस्तित्व' या नाटकातून एक वेगळ्या आणि गंभीर भूमिकेत भरत जाधव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bharat Jadhav on Majha Katta : सिनेमा, ओटीटी, वेबसीरिज, मालिका या सर्व गोष्टींपेक्षा अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) हे रंगभूमीवरच जास्त रमले आहेत. याबद्दल माझा कट्ट्यावर (Majha Katta) भरत जाधव म्हणाले,"रंगभूमीवर मी घडलो आहे. एकांकिकेपासून काम करायला मी सुरुवात केली. चित्रपट, मालिका हीदेखील माध्यम आहेत. पण पण रंगभूमीची एक वेगळी गंमत आहे. मजा आहे. लाईव्हचा विनोद कधी फसत नाही. स्टेजवर काम करताना एक वेगळचं समाधान मिळतं. रंगमंचावर काम करताना येणारी गंमत आजही मला आवडते. BMW असो वा पहिली व्हॅनिटी, प्रत्येक नव्या गाडीचं स्टिअरिंग वडिलांच्या हाती दिलं आहे". अभिनेता भरत जाधव यांचा माझा कट्टा विशेष भाग प्रेक्षकांना आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर पाहायला मिळेल.
भरत जाधव आणि विनोदाचं नातं कसं जुळलं?
भरत जाधव आणि विनोदाचं टायमिंग हे एक वेगळचं समीकरण आहे. याबद्दल बोलताना भरत जाधव म्हणाले,"प्रत्येक पात्राची एक गंमत असते. माझ्या नशीबाने मला शाहीर साबळेंसारखी संस्था मिळाली. विनोदाचं सादरीकरण करण्याची शाहीर साबळेंची एक वेगळी पद्धत होती. त्या प्रोसेसमध्ये शिकत गेलो. पुढे विनोदी पद्धतीची नाटकं येत गेली. करिअरची सुरुवात 'ऑल द बेस्ट' सारख्या नाटकाने झाली आहे. त्यात एकही शब्द न बोलता मला विनोद करायचा होता. पुढे 'सही रे सही' हे नाटक मिळालं. या नाटकाचे लवकरच 4444 प्रयोग होतील. गेल्या 22 वर्षांपासून या नाटकाचे जोरदार प्रयोग सुरू आहेत. काही नाटकांची एक गंमत असते. लाईव्सनेस ठेवण्याचा प्रयत्न करतो. 'सई रे सही' या नाटकाचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. पण प्रत्येकवेळी कोणीतरी नव्याने ते नाटक पाहत असतं. त्यामुळे 'सही रे सही'चे एवढे प्रयोग केल्यानंतर कधी कंटाळा येत नाही. नाविन्य ठेवण्याचा प्रयत्न करतो".
अन् भरत जाधव यांचा 'तो' प्रयोग फसला...
फसलेल्या प्रयोगाबद्दल बोलताना भरत जाधव म्हणाले,"आता होऊनच जाऊ द्या' सारखं नाटक केलं होतं. ते खूप फसलं होतं. तसेच 'पैसाच पैसा' या नाटकात माझं 'आणि भरत जाधव' असं नाव पहिल्यांदा लागणार होतं आणि नाव लागणार असल्याने मी खूप उत्सुक होतो. पण तेही फसलं होतं. 'सही रे सही'च्या एकाही प्रयोगादरम्यान फसगत झालेली नाही. एकदाही आणिबाणीचा प्रसंग आलेला नाही. नटाने सतर्क राहायलाच हवे. पण करिअरच्या सुरुवातीला 'ऑल द बेस्ट' या नाटकाचा बालगंधर्वला प्रयोग होता. त्या नाटकातील माझं पात्र मुकं होतं. एका प्रवेशादरम्यान मला जोरात शिंक आली. त्यानंतर सॉरी असं म्हणून मी पुन्हा माझ्या पात्रात आलो. त्यावेळी पहिल्या रांगेतून मला आवाज आला हा बोलला का गं? एकदा या नाटकाच्या एका प्रवेशात देवेंद्र पेमने सांगितलं होतं की, मुका प्रपोज करतोय असा अभिनय कर. त्यावेळी मी ते ट्राय केलं तर लोकांना वाटलं की मी चुकलो आहे. अशाप्रकारे काही प्रयोगादरम्यान माझी फसगत झाली आहे".
भरत जाधव यांचं 'अस्तिस्व' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! (Bharat Jadhav Upcoming Project)
भरत जाधव यांचं 'अस्तिस्व' हे नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. या नाटकाबद्दल बोलताना ते म्हणाले,"महापालिकेत झाडू खात्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारं अस्तिस्व हे नाटक आहे. तो व्यक्ती रिटाटरमेंटला आला आहे. मुलाचं आणि मुलीच्या लग्नाचं सुरू आहे. पण बापाचा कल गावी जाण्याकडे आहे. पण मुलांची गावी जाण्याची इच्छा नाही. मुलांचा उथळपणा कुटुंबाला त्रासदायक होतो हे दाखवणारं 'अस्तिस्व' हे नाटक आहे. आईचा जीव घरात अडकलाय. या नाटकातील प्रत्येक पात्र अधांतर आहे. प्रत्येकजण स्वत:चं अस्तिस्व सांगत आहे. प्रत्येक कुटुंबीय नक्कीच हे नाटक रिलेट करतील. गेल्या काही दिवसांपासून मी गंभीर भूमिकांच्या शोधात होतो. हे नाटक येणाऱ्या प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.
आयुष्यभर बापाने टॅक्सी चालवली, भरत जाधवने प्रत्येक कंपनीची गाडी घेतली, बापाच्या हाती स्टिअरिंग दिलं!
भरत जाधव यांच्या प्रॉपर्टीबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले,"एखादी जागा, गाडी पाहिल्यानंतर मस्त आहे ना, असं म्हणायची मला सवय आहे. त्यामुळे माझी खूप प्रॉपर्टी असल्याचा लोकांचा समज झाला आहे. पण खरंतर असं काहीही नाही. BMW असो वा पहिली व्हॅनिटी प्रत्येक नव्या गाडीचं स्टिअरिंग वडिलांच्या हाती दिलं आहे. आयुष्यभर वडिलांनी टॅक्सी चालवली होती.
'ऑल द बेस्ट', 'सही रे सही', 'सौजन्याची ऐशी तैशी', 'श्रीमंत दामोदर पंत' अशा नाटकांमधून आपल्या तुफान एनर्जीच्या जोरावर महाराष्ट्रातील विनोदाची लोकधारा पुढे नेत असताना आता 'अस्तित्व' (Astitva) नाटकाच्या माध्यमातून एक वेगळे भरत जाधव रंगमंचावर वावरताना दिसतील. विनोदी कलाकार गंभीर भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारु शकतो हे वाक्य सिद्ध करण्यासाठी भरत जाधव पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
#माझाकट्टा
— माझा कट्टा (@ABPMajhaKatta) October 28, 2023
अभिनेता भरत जाधव
माझा कट्ट्यावर...
पाहायला विसरू नका
आज रात्री 9 वाजता!#bharatjadhav #ABPMajha @abpmajhatv pic.twitter.com/kGiMsvMKiF
संबंधित बातम्या