Salman Khan Security : सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ, Y+ सुरक्षाही कडक; घरापासून ते फार्म हाऊसपर्यंत सगळीकडे पोलीस तैनात
Salman Khan Y Plus Security Upgraded: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानला Y+ सुरक्षा देण्यात आली होती, आता सुपरस्टारची सुरक्षा आणखी कडक करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.
Salman Khan Y Plus Security Upgraded: राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique ) यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बिश्नोई गँगकडूनच सलमान खानला मागच्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. अशा परिस्थितीत बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतरच सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याच्या घरापासून फार्म हाऊसपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सलमान खानला यापूर्वी Y+ श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती जी आता अपग्रेड करण्यात आली आहे. त्याची हीच सुरक्षा आणखी कडक करण्यात आल्याचीही माहिती सध्या समोर येत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सलमान खानच्या सुरक्षेत आता पोलिसांच्या एस्कॉर्ट कारचा समावेश करण्यात आला आहे. जेव्हा सलमान घराबाहेर पडेल त्यावेळी ही कार त्याच्यासोबत असेल.
सलमान खानच्या फार्म हाऊसची सुरक्षाही वाढवली
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच्या घराबाहेर पोलीस कडेकोट बंदोबस्तामध्ये आहेत. माध्यमांनाही त्याच्या घराजवळ परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या पनवेल फार्म हाऊसची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. फार्म हाऊसच्या आत आणि बाहेर पोलीस तैनात करण्यात आलेत. याशिवाय या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे.
शूटिंग लोकेशनवर पोलीस उपस्थित राहणार
रिपोर्टनुसार, ससलमान खान कुठेही शूटिंगसाठी जाईल, स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर पोलिसांची टीम शूटिंगच्या ठिकाणी पोहोचेल आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेईल.
सलमान खान टार्गेट असल्याचा लॉरेन्स बिश्नोईचा कबुलनामा
बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईनं अनेकदा सलमान खान निशाण्यावर असल्याची कबुलीदेखील दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईनं त्यांच्या निशाण्यावर सलमान खान असल्याचं NIA समोर कबुल केलं होतं. 1998 मध्ये सलमान खाननं एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जोधपूरमध्ये काळविटाची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो. पूज्यस्थानी असलेल्या काळविटाची शिकार केल्यामुळे सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे.
लॉरेन्स बिश्नोई त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि नेमबाज संपत नेहराला सलमान खानच्या मुंबईतील घराची रेकी करायला पाठवलं होतं. पण संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोईनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमप्रमाणे स्वतःची टोळी तयार केली आहे.