Arshad Warsi : दादा कोंडकेंचा फॅन अर्शद वारसी बॉलिवूडमध्ये कसा आला? 'माझा महाकट्टा'वर 'सर्किट'ची कहाणी
Arshad Warsi on ABP Majha Mahakatta : ' बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी याने एबीपी माझाच्या महाकट्टावर दिलखुलास गप्पा मारल्या. त्याने त्याच्या आयुष्याचा प्रवास यावेळी उलगडला.
Arshad Warsi on ABP Majha Mahakatta : 'तेरे मेरे सपने' या सिनेमाच्या माध्यमातून आपली उंच स्वप्न घेऊन एक अभिनेता बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत अवतरला. त्यानंतर मुन्नाभाई एमबीबीएस (Munna Bhai M.B.B.S) यांसारख्या सिनेमांमधून त्यानं प्रेक्षकांच्या मनावर अगून मनमुराद हसून राज्य केलं. अगदी कष्टापासून सुरु झालेला प्रवास हा सुपरस्टारपर्यंत पोहचला आणि अर्शद वारसी हा प्रेक्षकांच्या आवडीचा अभिनेता झाला. हसवणं सोप्पं असतं पण त्या हसवण्यास सातत्य असणं जास्त कठिण असतं. या सातत्यामागचा प्रवासही तितकाच कठिण असतो. अर्शदचा (Arshad Warsi) हाच प्रवास त्याने माझा महाकट्टावर उलगडला आहे.
अर्शदला पहिल्यांदा सिनेमात काम का करावसं वाटलं, बॉलीवूडचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं पण ते स्वप्न सत्यात कसं उतरलं असा सगळा प्रवास अर्शदने माझा कट्टावर सांगितला आहे. तसेच त्याने त्याचा पहिला सिनेमा तेरे मेरे सपनेचा एक खास किस्सा देखील यावेळी शेअर केला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा अभिनय म्हणजे काय हे कळतं नव्हतं ते प्राण यांचा अभिनय पाहून अभिनयाचे धडे कसे गिरवले याविषयी देखील अर्शदने सांगितलं आहे.
'दादा कोंडकेंचे सिनेमे आवर्जुन पाहायचो'
अर्शदचं शिक्षण हे नाशिकमध्ये गेलं आहेत. त्याविषयीच्या आठवणी सांगताना अर्शदने म्हटलं की, मी जेव्हा नाशिकला होतो तेव्हा मी तिथे दादा कोंडकेचे सिनेमे पाहायचो. तेव्हा मला तिथे सैन्यात भर्ती व्हायचं होतं. माझी ती खूप इच्छा होती. पण ते झालं नाही. पण मी नाशिकला अजूनही खूप मिस करतो. कारण ती जागा माझ्यासाठी खूप खास आहे.
सिनेमात काम करावं हे मनात कधी आलं?
याविषयी बोलताना अर्शदने म्हटलं की, जेव्हा तुम्हाला माहित नसतं की जगणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं तेव्हा तुमची स्वप्न सगळ्यात पुढे असतात असतात. माझ्या बाबतीतही तसंच झालं. माझ्या मित्रासोबत तेरे मेरे सपनेचा दिग्दर्शक माझ्या घरी आला. तेव्हा त्याने माझं वागणं कसं आहे वैगरे आणि त्याने मला सिनेमात काम करणार का? असं विचारलं. पण सिनेमात काम करण्याची भीती वाटते म्हणून मी तेव्हा त्याला नाही म्हटलं होतं. तेव्हा त्याने म्हटलं की, ती किमान तुझे फोटो तरी पाठव. तेव्हा मी त्यांना छत्तीस फोटोंच्या रोलमध्ये फोटो पाठवले, ते पाहून जया बच्चन यांनी मला भेटायला बोलावलं. मला सुरुवातीला वाटलं की, त्या मला आता ओरडतील. पण त्यांनी मला सिनेमासाठी निवडलं.
पुढे त्याने म्हटलं की, 'पण माझा संघर्ष त्यानंतर सुरु झाला. कारण मला सिनेमात जरी घेतलं तरी मला अभिनय येत नव्हता. पण ते मी सगळं केलं. सिनेमा झाल्यावर मी जया बच्चन यांना विचारलं की तुम्ही मला या सिनेमासाठी का निवडलं. त्यावर त्यांनी मला सांगितलं की, तू छत्तीस फोटो पाठवलेस, त्यामध्ये तुझे छत्तीस वेगवेगळे एक्सप्रेशन होते आणि तुला कॅमेऱ्याची अजिबात भीती वाटत नाही हे त्यावरुन कळलं.'
'संगीतामध्ये काही करावसं नाही वाटलं का?'
पुढे त्याने म्हटलं की, 'माझे वडिल हे मोठे संगीतकार होते. पण माझ्या वडिलांना वाटलं की माझ्यात ते टॅलेंट नाही. त्यामुळे संगीत बाजूला राहिलं आणि मग मी डान्सकडे वळलो. माझं दहावीचं शिक्षण झालं आणि मी शिक्षण सोडलं. पण मी हे मुद्दाम नाही केलं मला ते करावं लागलं. घराची परिस्थिती तशी होती. त्यानंतर मला काम करणं गरजेचं होतं. सुरुवातीला मी अगदी छोटी छोटी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माझा एक मित्र आहे तेव्हा तो कोरिओग्राफर होता. असा तो प्रवास सुरु झाला आणि मग मी देशाचंही प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर माझा प्रवास थांबला नाही.'
अर्शदचं मराठी कनेक्शन कसं आहे?
अर्शदने त्याच्या मराठी कनेक्शनविषयी बोलताना म्हटलं की, मराठी मला समजतं. माझं शिक्षणही मराठीत झालं होतं. पण जिथे माझं शिक्षण झालं तिथे थोडी इंग्रजीची सक्ती होती. त्यामुळे ती इंग्रजी बोलायची लागायची. मला 9 ते 5 नोकरी करायची नव्हती. मला कलेच्या क्षेत्रात जायचं होतं. मी उत्तम उद्योजक होणार नाही, त्यामुळे ठरवलं होतं की इथेच जायचं आणि माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, कोणतंही काम करण्यात अजिबात लाज नाही.
'सिनेमा सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले'
माझ्या पहिल्या सिनेमानंतर मी सिनेमा सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी त्या दिग्दर्शकाला सांगितलं होतं, की तुला दुसरा कुणीतरी भेटेल पण मला हे जमणार नाही. हे सगळं झाल्यानंतर चार दिवस शुटींगला असताना मला तिकीट आलं आणि सांगितलं की हैदराबादला शुटींग आहे, तुम्ही या. तेव्हा मला कळालं की माझा मेसेज त्या दिग्दर्शकापर्यंत पोहचलाच नाही. तेव्हा मी तिथे गेलो पण मला काहीच माहित नव्हतं. तेव्हा तिथे प्राण होते. त्यांना पाहून मला वाटलं की, आपण ह्यांना पाहिलं आहे, ह्यांना फॉलो करु. तेव्हा मी सकाळी सेटवर जायचो आणि प्राण यांचा अभिनय पाहायचो, हा अनुभव अर्शदने शेअर केला.