Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माची हायकोर्टात याचिका, विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसीला आव्हान
Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने (Sales Tax Department) बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर गुरूवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या याचिकेवर विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी 6 फेब्रुवारी घेण्याचं निश्चित केलं आहे.
अनुष्कानं यापूर्वी याच मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र अनुष्का यावर स्वतः याचिका का दाखल करत नाही?, एखाद्या व्यक्तीनं कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही. असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतला होता त्यानंतर ती याचिका मागे घेऊन पुन्हा नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा देत ती याचिका निकाली काढली होती.
काय आहे प्रकरण? (Anushka Sharma Case)
अभिनेत्री अनुष्का शर्माला विक्रीकर विभागानं नोटीस बजावली आहे. अनुष्कानं एका पुरस्कार सोहळ्यात केलेलं सादरीकरण आणि निवेदन यामुळे व्यावसायिकरित्या तिच्या उत्पादनांची जाहिरातबाजी झालेली आहे, असा ठपका विक्रीकर विभागानं ठेवला आहे. यासंबंधी साल 2012-13 साठी 12.3 कोटींच्या उत्पनावर 1.2 कोटी तर साल 2013-14 साठी 17 कोटींच्या उत्पनावर 1.6 कोटी रुपये कर थकबाकी दाखवली आहे. ही थकबाकी वसूल करण्याची नोटीस विक्री कर उपायुक्तांनी पाठवली आहे. या नोटीसीला अनुष्कानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे.
याप्रकरणी अनुष्कापुढे अपिलीय लवादापुढे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा करत राज्य सरकारनं या याचिकेला विरोध केला होता. मात्र जर आम्ही ते अपील केलं तर आम्हाला त्यापूर्वी करातील 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल असा दावा अनुष्काच्यावतीनं करण्यात आला आहे.
अनुष्काचा आगामी सिनेमा
अनुष्का शर्माचा 'चकदा एस्कप्रेस' (Chakda Xpress) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अनुष्का या सिनेमाचं शूटिंग करत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या