(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फ्रान्समधल्या भारतीय दूतावासासह अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर यांची सौमित्र चटर्जी यांना श्रद्धांजली
फ्रान्समधल्या भारतीय दूतावासाने सौमित्र चटर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर यांनीही चटर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बंगाली सिनेसृष्टीचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सौमित्र चटर्जी यांच्या निधनाने संपूर्ण भारत हळहळतो आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेकांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबत त्यांच्या जाण्याची दखल घेत फ्रान्समधल्या भारतीय दूतावासानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यालाही एक कारण आहे.
सौमित्र चटर्जी हे सत्यजीत रे यांचे अत्यंत आवडते कलाकार होते. सत्यजीत रे यांच्या अपू ट्रॉयोलॉजीमधल्या तिसऱ्या सिनेमाच अपूचं काम केलं होतं ते सौमित्र यांनी. म्हणून त्यांच्या निधनाने आपण एक आपल्या कुटुंबातला सदस्य गमावला आहे असे उद्गार सत्यजीत रे यांच्या कुटुंबियांनी काढले. आता फ्रान्समधल्या भारतीय दुतावासानेही चटर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सौमित्र यांना 2017 मध्ये फ्रान्समधला सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा ओद्रे दे आर्ट्स हा बहुमान मिळाला होता. त्यांनी सिनेसृष्टीत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन फ्रान्सने त्यांना हा बहुमान दिला. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. भारतीय दुतावासाने सोशल मीडियावर त्यांच्या जाण्याने श्रद्धांजली वाहिली आहे.
Soumitra Chatterjee Death : दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन, वयाच्या 85 वर्षी अखेरचा श्वास
शर्मिला टागोर यांनीही सौमित्र यांच्या निधनाने आपण एक आपला अत्यंत जवळचा मित्र गमावल्याचं म्हटलं आहे. शर्मिला आणि सौमित्र यांनी अपूर संसारमध्ये 1959 साली एकत्र काम केलं होतं. शर्मिला म्हणतात, 'सौमित्र माझे खूपच जवळचे मित्र होते. आम्ही खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या. त्यांच्यासारखा दुसरा मित्र मिळणे नाही. आम्ही अगणित किस्से एकमेकांशी शेअर केले आहेत.' अमिताभ बच्चन यांनीही सौमित्र चटर्जी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीचा एक खांब निखळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन आणि चटर्जी यांचा जो फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे तो कोलकाता इथे झालेल्या इफ्फीचा आहे.
सौमित्र चटर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर कोलकात्यात उपचार सुरू होते. परंतु अखेर त्यांचे निधन झाले. सौमित्र यांच्या निधनानंतर चटर्जी कुटुबियांनीही एक आवाहन केलं आहे. सौमित्र यांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी कुणीही घरी येऊ नये असं ते म्हणतात सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचं पालन करून कुणीही कोणतीही रिस्क घेऊ नये असंही चटर्जी कुटुंबियांना वाटत असल्याचं ते सांगतात.
सौमित्र यांच्या जाण्याने अमिताभ यांनीही दु:ख व्यक्त केलं. ते म्हणतात,
T 3722 - Soumitra Chatterjee .. an iconic legend .. one of the mightiest pillars of the Film Industry, .. has fallen .. a gentle soul and abundant talent .. last met him at the IFFI in Kolkata .. Prayers .. 🙏 pic.twitter.com/GSFYacxKCh
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2020