'त्या' एका वादानंतर अमिताभ अन् अजिताभ बच्चन मतभेद टोकाला गेलेले, वडिलांच्या निधनानंतर सगळंच बदललं, काय घडलेलं?
अजिताभ अनेक कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. अभिषेक-ऐश्वर्याच्या साखरपुड्यातही त्यांची उपस्थिती नव्हती.

Ajitabh bachchan: बच्चन कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते अमिताभ बच्चन यांचं भव्य व्यक्तिमत्त्व, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि श्वेता. मात्र या झगमगाटामागे एक नाव असं आहे, ज्याबद्दल फार कमी चर्चा होते -ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचे धाकटे भाऊ अजिताभ बच्चन.
हरिवंश राय बच्चन यांचे दोन पुत्र - अमिताभ आणि अजिताभ. अमिताभ जसे सिनेसृष्टीत सर्वोच्च स्थानी पोहोचले, तसे अजिताभ यांनी कायमच ग्लॅमरपासून अंतर ठेवलं. मात्र एक काळ असा होता, जेव्हा बिग बींच्या करिअरच्या पायाभरणीत अजिताभ यांचा मोठा वाटा होता.
अभिनयाच्या स्वप्नामागे भावाचा पाठिंबा
शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन्ही भाऊ कोलकात्यात नोकरी करत होते. त्याच काळात अमिताभ यांच्या मनात अभिनयाचं स्वप्न आकार घेत होतं. अजिताभ यांनी हे ओळखलं आणि भावाच्या स्वप्नाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अमिताभ यांचे फोटो घेऊन ते निर्मात्यांकडे गेले. सुरुवातीला वारंवार नकार मिळाले, मात्र प्रयत्न सुरूच राहिले. अखेर अमिताभ यांना पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली.

अमिताभ यांचे ‘मॅनेजर’ होते अजिताभ
मुंबईत अमिताभ यांचा संघर्ष सुरू असताना अजिताभ कोलकात्यातच होते. अमिताभ यशाच्या शिखराकडे जाऊ लागल्यानंतर अजिताभ यांनी नोकरी सोडून मुंबई गाठली. ते अमिताभ यांचे मॅनेजर बनले. चित्रपटांची निवड, आर्थिक व्यवहार, भेटीगाठी - सगळं काही अजिताभच पाहत होते. त्या काळात अमिताभ यांना भेटायचं असेल, तर आधी अजिताभ यांची परवानगी घ्यावी लागायची.
व्यवसाय, राजकारण आणि वाढत गेलेले मतभेद
नंतर अमिताभ बच्चन राजकारणात सक्रिय झाले, तर अजिताभ परदेशात लंडनला व्यवसायासाठी गेले. या व्यवसायात अमिताभ यांची गुंतवणूक असल्याचंही बोललं जातं. अजिताभ आणि त्यांच्या पत्नी रमोलाने तिथे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केली होती.
मात्र बोफोर्स प्रकरणात अमिताभ यांचं नाव आल्यानंतर त्याचे पडसाद अजिताभ यांच्या व्यवसायावरही उमटले. चौकशा, अफवा आणि दबावामुळे अजिताभ लंडनहून बेल्जियमला गेले. जरी नंतर दोघांनाही क्लीन चिट मिळाली, तरी या काळात भावांमधील अंतर वाढत गेलं.
वडिलांच्या निधनानंतर तुटले नातं
हरिवंश राय बच्चन जिवंत असताना दोन्ही भाऊ किमान औपचारिकरीत्या एकत्र दिसत होते. मात्र वडिलांच्या निधनानंतर हे नातं पूर्णपणे तुटल्याचं सांगितलं जातं. अजिताभ अनेक कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. अभिषेक-ऐश्वर्याच्या साखरपुड्यातही त्यांची उपस्थिती नव्हती.

वर्षांनंतर पुन्हा जवळ आले
2007 नंतर परिस्थिती बदलू लागली. अजिताभ आणि पत्नी रमोलाचा घटस्फोट झाला. त्यांच्या मुलींपैकी एक - नैना. हिच्या लग्नात अमिताभ आणि अजिताभ वर्षांनंतर एकत्र दिसले. पुढे 2012 च्या सुमारास संबंध सुधारल्याचं बोललं गेलं. अजिताभ पुन्हा ‘प्रतीक्षा’ बंगल्यात राहू लागले, मात्र आजही ते प्रसारमाध्यमांपासून दूरच असतात.
आजही अजिताभ बच्चन झगमगाटापासून दूर, शांत आयुष्य जगतात. पण अमिताभ बच्चन आज जे काही आहेत, त्या प्रवासात अजिताभ यांचा मोलाचा वाटा होता, हे नाकारता येत नाही.























