'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट 'गंगुबाई काठीयावाडी'मध्ये दिसणार आलिया भट, फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : अखेर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने संजय लीला भन्साळींचा चित्रपट साइन केला. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आपला आगामी चित्रपट 'गंगुबाई काठीयावाडी'ची घोषणा केल्यापासूनच या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्णाण झाली होती. अखेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणाऱ्या आलियाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. आलिया या सिनेमात महिला गँगस्टर असलेल्या गंगूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मंगळवारी 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचा टीझर पोस्ट करण्यात आला होता. तर आज मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या आलियाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे.
संजय लीली भन्साळींच्या या चित्रपटाची कथा 'द मॅडम ऑफ कामाठीपुरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर गंगुबाईंचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. तेथील महिलांना आर्थिक मदत करणं, त्यांच्या हक्कांसाठी लढणं यांसाठी त्यांना ओळखलं जातं. अशातच वेश्याव्यवसाय करताना कुख्यात गुंडांसोबतच्या ओळखी आणि त्यामुळे आयुष्यातील अनेक चढउतार आले. अशीच त्यांच्या संपूर्ण कहाणी या चित्रपटातून मांडणार आहे.
दरम्यान, आलिया पहिल्यांदाच एका लेडी गँगस्टरची भूमिका साकरणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आलियाच्या करियरला कलाटणी देणारा ठरू शकतो. आलियाच्या या चित्रपटातील लूकबाबत बोलायचं झालं तर आलिया या लूकमध्ये क्लासी दिसत आहे. आलियाच्या कपाळावरील कुंकू लक्ष वेधून घेत आहे. तसेच डिपनेक असलेला ब्लाऊज, कपाळावरील कुंकू, नाकातली नथ, लांब स्कर्ट असा तिचा लूक आहे. हा चित्रपट हुसैन जैदी 'माफिया क्विन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित बातमी :
'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार
भारताची स्टार क्रिकेटर 'नादिया एक्सप्रेस'च्या भूमिकेत अनुष्का शर्मा





















