एक्स्प्लोर
Advertisement
'नशीबवान'च्या नशिबी अवहेलना, भाऊ कदमची पोस्ट
ज्या डोंबिवलीचा वारंवार उल्लेख आपण अभिमानाने करतो, तिथेसुद्धा 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही, अशी व्यथा अभिनेता भाऊ कदमने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे
मुंबई : महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांच्या होणाऱ्या गळचेपीविरोधात अनेक कलाकार आवाज उठवताना दिसत आहेत. आणि... डॉ काशिनाथ घाणेकर, भाई, लव्ह यू जिंदगी यासारख्या चित्रपटांची मुंबई-पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात मुस्कटदाबी झाल्याचं उदाहरण ताजं असतानाच अभिनेता भाऊ कदमच्या 'नशीबवान'ला असाच काहीसा अनुभव आला. त्यानंतर भाऊने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
परभाषिक चित्रपट हिट झाल्यास मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच दुजाभाव दिला जातो, अशी हतबलता भाऊ कदमने व्यक्त केली आहे. मध्यमवर्गीयांसाठी तयार केलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात आणि मराठी चित्रपट बघायला तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत अशी आवई उठवली जात असल्याची तक्रार भाऊने केली आहे. भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला 'नशिबवान' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी म्हणजेच 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला होता.
ज्या डोंबिवलीचा वारंवार उल्लेख आपण अभिमानाने करतो, तिथेसुद्धा 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही, अशी व्यथा भाऊ कदमने मांडली आहे. एका दाक्षिणात्य चित्रपटाने आठवड्या अखेरीस मुंबईत सव्वाशेहून अधिक शो अडवले, पण आपल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही, अशी हळहळही त्याने व्यक्त केली आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट?
एखादा परभाषीय चित्रपट 'हिट' होऊन जातो आणि रातोरात आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातुन पायउतार व्हावं लागतं. वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून हे दाखवलं जातं की तुमचा 'मराठी' चित्रपट चालतच नाही. मध्यमवर्गीयांसाठी बनवलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात, जेव्हा आमचा मराठी चाकरमानी माणूस आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो. मग बोंब उठवली जाते की, तुमचा मराठी चित्रपट बघायला तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत. 'नशीबवान' च्या निमित्ताने मला आणि माझ्या निर्मात्यांना ह्याचीच प्रचिती आली. ज्या डोंबिवली चा उल्लेख मी हवा येऊ द्या च्या प्रत्येक भागात करतो, ज्या 'डोंबिवलीचा मी' म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही. आमचा संपुर्ण चित्रपट मुलुंड मधे चित्रित झाला आहे. तिथेही एकाही चित्रपटगृहात 'नशीबवान' ला स्थान मिळाले नाही. कित्येक लोक चित्रपटगृहात जाऊन परत फिरले आणि ऑनलाइन बुकींग करून गेलेल्यांना शो कॅन्सल झाल्याचे कारण देऊन 'हिट' झालेल्या हिंदी चित्रपटाची तिकिटं त्यांच्यावर लादली गेली. एका दाक्षिणात्य चित्रपटाने ह्या आठवड्या अखेरीस मुंबईत सव्वाशेहून अधिक शो अडवले पण आपण आपल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही. काबाडकष्टाने चित्रपट तयार करणारे निर्माते आता प्रदर्शनासाठीही खस्ता खात आहेत. एक-एक चित्रपटगृह मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.
ज्या हिंदी चित्रपटसृष्टीला खत पाणी घालून आपल्या महाराष्ट्राने जोपासलं, मोठं केलं ती आपल्या मराठी सिनेमाची अशीच पायमल्ली करत राहणार का? आपल्या मराठी चित्रपटाला निदान महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement