एक्स्प्लोर
....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली
आमीरने अनुष्कापासून ते क्रिकेटमधील सर्वात आवडती खेळी अशा विविध मुद्द्यांवर विराटला बोलतं केलं.

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली यांनी झी टीव्हीवरील एका चॅट शोमध्ये गप्पा मारल्या. यावेळी दोघांनी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक बाबींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. आमीरने अनुष्कापासून ते क्रिकेटमधील सर्वात आवडती खेळी अशा विविध मुद्द्यांवर विराटला बोलतं केलं. तर विराटनेही आमीर खानबद्दल उत्सुकता वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं खुद्ध आमीरकडून काढून घेतली. यावेळी आमीर खानने विराटच्या 2011 च्या वर्ल्ड कपमधील फायनल मॅचच्या खेळीचं कौतुक केलं. इतकंच नाही तर ती विराट कोहलीची सर्वात आवडलेली खेळी होती, असंही आमीरने नमूद केलं. त्याचं कारण म्हणजे विश्वचषकाच्या फायनलमध्ये घरच्या मैदानात सचिन आऊट झाला, त्यावेळी सगळं संपलं अशी भावना चाहत्यांची झाली. सर्वत्र शांतता पसरली होती, त्यावेळी तुलनेने नवखा विराट कोहली मैदानात आला. मात्र कोहलीने गंभीरच्या साथीने आवश्यक भागीदारी रचली. कोहलीने 35 धावाच केल्या, पण त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. जर कोहली लवकर आऊट झाला असता, तर टीम इंडिया आणखी डगमगली असती, अशी भावना आमीरने व्यक्त केली. ...मलिंगाने यॉर्कर मारु नये असा विचार करत होतो आमीरच्या या प्रतिक्रियेनंतर विराट कोहलीने त्या मॅचचा प्रसंग सांगितला. सचिन तंबूत परतत होता आणि मी मैदानात जात होतो. आख्खं स्टेडियम शांत झालं होतं, माझ्यावर खूपच दबाव वाढत होता. त्यातच समोर मलिंगा गोलंदाजीसाठी होता. माझ्या मनात सतत मलिंगाने पहिला बॉल यॉर्कर मारु नये हाच विचार सुरु होता. सुदैवाने त्याने यॉर्कर टाकला नाही, मी दोन-तीन चेंडू खेळू काढले आणि माझा दबाव कमी झाला, असं कोहलीने सांगितलं. आमीरचा प्रश्न: तुझ्या बॅटिंगला आव्हान देणारा जगातील सर्वोत्तम गोलंदाज कोण? विराटचं उत्तर : सध्याच्या काळात बोलायचं झालं, तर पाकिस्तानचा मोहम्मद आमीर हा एक चांगला गोलंदाज आहे. जगात सध्या टॉपचे जेव्हढे गोलंदाज आहेत, त्यात आमीरचं नाव घ्यावं लागेल. आमीरच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना, तुम्हाला सावध राहून, लक्ष विचलित होऊ न देता फलंदाजी करावी लागते. दरम्यान, यापूर्वी आशिया चषक 2016 मध्ये विराटने आमीरचं कौतुक केलं होतं. आमीर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, ते लाजवाब आहे असं कोहली त्यावेळी म्हणाला होता. मोहम्मद आमीरनेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये विराट कोहलीची विकेट घेऊन, भारताचा महत्त्वाचा अडथळ दूर केला होता. आमीरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने चॅम्पियन्स चषक आपल्या नावे केला होता. आमीरची विराटला ऑफर दरम्यान, आमीर खानने विराट कोहलीला यावेळी एक ऑफरही दिली. “विराट कोहलीच्या जाहिराती आपण पाहिल्या आहेत. त्यातील त्याची अॅक्टिंग ही कसलेल्या अभिनेत्यासारखी आहे. त्यामुळे कोहलीने क्रिकेट खेळून झालं की आमच्या क्षेत्रात म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात यावं” अशी ऑफर आमीर खानने कोहलीला दिली. आमीरची ऑफर कोहलीने नाकारली दरम्यान, आमीरचही ही ऑफर विराट कोहलीने प्रांजळपणे नाकारली. कोहली म्हणाला, छोट्या छोट्या जाहिराती करणं हे छोटं काम आहे, ते मी झटपट आटोपण्याचा प्रयत्न करतो. जाहिरात करताना मला काही वेळासाठीच अभिनय करायचा आहे हे माहित असतं, त्यामुळे मी त्या आटोपून नेतो. पण मोठे सीन करणं अशक्य आहे, असं कोहली म्हणाला. कोहलीला आवडलेला आमीरचा सिनेमा यावेळी कोहलीने आमीर खानचा कोणता सिनेमा आपल्याला सर्वात जास्त आवडतो, याबद्दलही सांगितलं. कोहली म्हणाला, आमीरचा ‘जो जिता वही सिकंदर’ हा सिनेमा मी कधीही विसरु शकणार नाही. शेवटच्या सायकल रेसमध्ये आमीर खानला दीपक तिजोरीचे साथीदार मारतात, मात्र आमीर पुन्हा त्यांना मागे टाकून पुढे येतो, हा सीन तर डोक्यात कायम आहे, असं कोहलीने सांगितलं. अनुष्काची कोणती गोष्ट सर्वाधिक आवडते? आमीर खानने विराटला अनुष्काबाबतही बोलतं केलं. अनुष्काची सर्वाधिक आवडणारी गोष्ट कोणती असं कोहलीला विचारण्यात आलं. त्यावर विराट म्हणाला, अनुष्काचा ही 'सुपर हॉनेस्ट' अर्थात अतिशय प्रामाणिक आहे. तिच्या ओटात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं. तिला जे वाटतं ते बोलून टाकते. कदाचित त्यामुळेच आमची जोडी जमली असावी" संबंधित बातमी धोकादायक गोलंदाज कोण? आमीरच्या प्रश्नावर कोहलीचं उत्तर..
आणखी वाचा























