स्तनपानाकडे अश्लील नजरेनं पाहू नका; फोटो शेअर करत नेहा धुपियाची विनंती
बॉलिवूड अभिनेत्री किंवा एकंदर बॉलिवूड कलाजगतानं कायमच कलेशी संलग्न विषयांसोबतच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही आपल्या भूमिका मांडल्या आहेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किंवा एकंदर बॉलिवूड कलाजगतानं कायमच कलेशी संलग्न विषयांसोबतच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही आपल्या भूमिका मांडल्या आहेत. समाजाला उद्देशून परखड भूमिकाही मांडल्या आहेत. अभिनेत्री नेहा धुपिया ही या कलाविश्वातीस एक अशीच अभिनेत्री. रुपेरी पडद्यासोबतच खऱ्या जीवनातही घेतलेल्या निर्णयांमुळं आणि ठाम भूमिकांमुळं ती कायमच चर्चेत असते. सध्या नेहानं एका अतिशय महत्त्वाच्या मुद्दयावर लक्ष वेधत तितकाच बोलका फोटोही पोस्ट केला आहे.
अनेकदा सोशल मीडियावर किंवा कोणत्या ठिकाणी स्तनपान करताना दिसणाऱ्या महिलेकडे पाहणाऱ्यांच्या नजरेत अश्लीलताही दिसून येते. ही बाब नाकारता येत नाही आणि हाच मुद्दा हेरत नेहानं नुकताच पोस्ट केलेला फोटो आणि त्याचं कॅप्शन बरंच काही सांगून जात आहे. आई होण्याचा प्रवास हे एक महिलाच समजू शकते, अशीच सुरुवात करत आपल्या कानावर जरी या साऱ्याची आनंदी बाजू येत असली तरीही त्याला भावनिक किनारही असते. अनेकदा हतबलताही असते ही बाब तिनं इथं अधोरेखित केली आहे.
कोरोनामुक्त होऊन परतलेल्या नवजात बालिकेचं कुटुंबाकडून एखाद्या नववधुप्रमाणं स्वागत
आई होणं आणि ती जे काही करते ते सारं करणं हे फार कठीण आहे, यातही खिल्ली उडवली जाण्याचा विषय वेगळाच. मी स्वत: या साऱ्याचा सामना केला आहे, त्यामुळं ते किती कठीण आहे हे मी जाणते, असं लिहित नेहानं एक स्क्रिनश़ॉटही शेअर केला आहे. जिथं एका युजरनं तिला स्तनपान करतानाच व्हिडीओही पोस्ट करायला सांगितलं होतं.
View this post on Instagram
बालकाच्या आईला, आपल्या बालकाला कुठे आणि केव्हा स्तनपान करायचं आहे याची निवड करण्याचा हक्क आहे. स्तनपानाकडे अश्लीलतेच्या नजरेतून पाहण्याची गरजच नाही; असा संदेश देत तिनं ही पोस्ट केली आहे. नेहाची ही सोशल मीडिया पोस्ट सध्या बरीच चर्चेत असून, महत्त्वाच्या मुद्द्यावर तिनं प्रकाशझोत टाकल्यामुळं अनेकांनीच तिचं कौतुकही केलं आहे.























