Video : कंगना पुन्हा चर्चेत आलीये, पाहा यामागे नेमकं काय निमित्त?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. राजकीय विषयांपासून ते अगदी कलाविश्वातील घडामोडींपर्यंत प्रत्येक गोष्टीत कंगना तिची मतं मांडत असते, अनेकदा ही मतं मांडणं तिला वादाच्या भोवऱ्यातही अडकवून जातात. सातत्यानं या न त्या कारणानं चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्रीनं यावेळी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मी़डियावर नुकताच तिचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाचा सुपरहिट अंदाज दिसून येत आहे. कारण, इथं बी- टाऊनची ही क्वीन घोडेस्वारी करताना दिसत आहे. रविवारचा वेळ प्रत्येकानं आपल्या परिनं व्यतीत केला. तर, कंगनानंही या दिवसाला खास टच दिला तो म्हणजे या घोडेस्वारीनं.
नारंगी रंगाचं टीशर्ट, काळ्या रंगाची पँट आणि या साऱ्याचा साजेसा आत्मविश्वास असाच तिचा अंदाज नेटकऱ्यांची मनं जिंकून गेला. अनेकांनाच तिच्या मणिकर्णिका या चित्रपटाची आठवणही झाली. जिथं कंगनानं झाशीच्या राणीच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला होता. या भूमिकेच्या निमित्तानं तिनं तलवारबाजी, घोडेस्वारी शिकली होती. ही शकवणी कंगना अद्यापही विसरलेली नाही, याचीच प्रचिती तिचा नुकताच व्हिडीओ पोस्ट करताना लक्षात येत आहे.
View this post on Instagram
कंगनाच्या आगामी चित्रपटाची चर्चा
कंगना येत्या काळात 'थलैवी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, चाहत्यांची त्याला पसंतीही मिळाली आहे. कोविड कारणामुळं या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
या चित्रपटांमागोमाग कंगना 'तेजस' आणि 'धाकड' या चित्रपटांचाही एक भाग आहे. याशिवाय मणिकर्णिका फिल्म्स या आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत तिनं एका चित्रपटाची घोषणाही केली आहे. त्यामुळं येत्या काळात कंगना बहुविध रुपांमध्ये झळकणार हे नक्की.























