Y श्रेणीच्या सुरक्षेबाबत सनी देओल यांचा मोठा खुलासा
बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राजकीय वर्तुळात आलेल्या सनी देओल यांना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाय दर्याची सुरक्षा देण्यात आल्याचं म्हटलं गेलं होतं. मागील काही दिवसांपासून याबाबतच्या बऱ्याच चर्चाही झाल्या. पण....
नवी दिल्ली : अभिनेता आणि भाजप नेता अशी ओळख असणाऱ्या सनी देओल (sunny deol ) यांना (Y) श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती नुकतीच उघड झाली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचललं गेल्याचं म्हटलं गेलं. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देओल यांना ही सुरक्षा पुरवण्यात आली असं म्हटलं गेलं. पण, आता खुद्द सनी देओल यांनीच याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.
आपल्याला वाय दर्याची सुरक्षा ही जुलै महिन्यातच मिळाली होती. त्याचा देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही असं त्यानं स्पष्ट केलं. ‘कालपासूनच काही माध्यमांनी चुकीचं वृत्त दिलं आहे की, मला (Y) श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली. मुळात मला जुलै महिन्यातच ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या सुरक्षाव्य़वस्थेला देशात सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाशी जोडलं जात आहे जे अगदी चुकीचं आहे’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
माध्यमांवर नाराजी व्यक्त करत देओल यांनी माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं. ‘मी माध्यमांमध्ये असणाऱ्या माझ्या काही सहकाऱ्यांना विनंती करु इच्छितो की, कोणतंही वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याविषयीच्या माहितीची पडताळणी करा’, असा सूर त्यांनी आळवला. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार किम थ्रेट परसेप्शनमुळं गृहमंत्रालयानं सनी देओल यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली असून, याअंतर्गत त्यांच्यासोबत 11 जवान आणि 2 पीएसओ असणार असं म्हटलं गेलं होतं.
कल से, कुछ गलत मीडिया रिपोर्ट्स है कि मुझे हाल ही में मुझे Y सुरक्षा मिली है। मुझे जुलाई 2020 से यह सुरक्षा प्रदान की गई है। इस सुरक्षा प्रावधान को चालू किसानों के आंदोलन से जोड़ने का प्रयास किया गया है जो गलत हैं।
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 17, 2020
शेतकऱ्यांसमवेत सनी देओल
सनी देओल यांनी हल्लीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करत सरकार शेतकऱ्यांसमवेत असल्याचं म्हटलं होतं. ‘मी साऱ्या जगाला सांगू इच्छितो की, ही आमचे शेतकरी आणि सरकार यांच्यातील बाब आहे. यामध्ये तुम्ही पडू नका. चर्चेनंतर दोन्ही पक्षांकडून या वादावर तोडगा नक्कीच निघेल. मला ठाऊक आहे की, अनेकजण यातून आपला फायदा साधू पाहत आहेत. इतकंच नव्हे तर ते काही अडचणीही उभ्या करत आहेत. पण, या व्यक्ती शेतकऱ्यांबाबत विचार करत नाहीयेत. त्यांचा एक वेगळाच मनसुबा आहे’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.