(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejas Thackeray : 'हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून तमाम मराठी माणसाच्या काळजात "धकधक" झालं', तेजस ठाकरेंच्या डान्सवर आशिष शेलारांची टीका
Ashish Shelar on Tejas Thackeray : तेजस ठाकरेंच्या डान्सवर आता आशिष शेलारांनी देखील टीका केली आहे. त्यामुळे आता या सगळ्याला राजकीय रंग येत असल्याचं पाहायला मिळतंय.
Ashish Shelar on Tejas Thackeray : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा संगीत सोहळा सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे गाजतोय. उद्धव ठाकरेंचे जिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी मित्राच्या लग्नात ठेका धरला आणि राजकीय वर्तुळात टीकेचा ठसका सुरु झाला. मुकेश अंबानी यांच्या लेकाच्या संगीत सोहळ्यात रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी तेजस ठाकरेंनी बॉलीवूडकरांसह शाहरुखच्या गाण्यावर ठेका धरला. तेजस ठाकरेंच्या या अंदाजाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. पण राजकीय वर्तुळातून मात्र टीकेची झोड उठवली जातेय. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंच्या या डान्सची खिल्ली उडवली आहे.
उत्तर प्रत्युत्तराच्या राजकीय खेळात आज तेजस ठाकरेंचा डान्स हा कळीचा विषय ठरला. भाजपच्या नेत्यांनी तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन सडकून टीका केली. त्यावर तेजस ठाकरे यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
आशिष शेलारांनी काय म्हटलं?
आशिष शेलारांनी एक्स पोस्ट करत तेजस ठाकरेंच्या डान्सवर टीका केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, जो मराठी तरुण "गोविंद रे गोपाळा" म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही, ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत, जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही,जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही, "गणा धाव रे... मला पाव रे.." म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही, तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला...! हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात "धकधक" झाले. असो हे नृत्य पण कसे "जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे "संजयकाका" महाराष्ट्राला पटवून देतीलच...!
जो मराठी तरुण "गोविंद रे गोपाळा" म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही..
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 9, 2024
ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत
जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही
"गणा धाव रे... मला पाव रे.." म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही..
तो… pic.twitter.com/u7ohexKiXL
नितेश राणेंची टीका, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'अनंत अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या तेजस ठाकरेला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं.' यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर देत म्हटलं की, त्यांना सायकॉलॉजी मदतीची खूप गरज आहे. परिणाम होतोय.
तेजस ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल
तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. या संगीत सोहळ्यात अंबानी कुटुंबियांसह अनेकांनी ठेका थरला. तेजस ठाकरे हे 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील ये 'लड़की, हाए, अल्लाह या गाण्यावर थिरकले.' त्यामध्ये तेजस ठाकरेंचाही समावेश आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा धाकटा नातू वीर पाहारिया देखील तेजस ठाकरेंसोबत मंचावर आहे. सध्या सोशल मीडियावर तेजस ठाकरेंचे हे व्हिडीओ तुफान व्हायरल होतायत.