Anshuman Vichare : अंशुमन विचारे आणि हेमंत पाटील पहिल्यांदा दिसणार एकत्र, 'पाहिले न मी तुला' नाटकात करणार कल्ला
Anshuman Vichare : सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' हे नवंकोर नाटक रंगभूमीवर येत्या 22 ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे.
Anshuman Vichare : आपल्यातील सळसळत्या ऊर्जेचं दर्शन घडवत कोकणाचा ‘झिल’ अंशुमन विचारे (Anshuman Vichare) जळगावचा ‘जाळंधुर’ लेक हेमंत पाटील (Hemant Patil) या दोन्ही अतरंगी कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने आजवर रसिकांचं मनोरंजन केलं. आता 'पाहिले न मी तुला' या नाटकातून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' हे नवंकोर नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.
लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे. ‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणणार आहे. अंशुमन विचारे, हेमंत पाटील यांच्यासोबाबत सुवेधा देसाई या नाटकात आहे. सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे.
'निखळ मनोरंजनसोबत आमच्या भन्नाट ट्यूनिंगची प्रेक्षकांना ट्रीट'
सहवासातल्या प्रेमाचे वेगवेगळे पैलू मांडणाऱ्या या नाटकात अंशुमन आजवरची सर्वात वेगळी भूमिका करणार आहे. ‘पाहिले न मी तुला' नाटकाच्या निमित्ताने मला आणि हेमंतला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. याआधी आम्ही कधी एकत्र काम केलेलं नाही. माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून हेमंत उत्तम आहे. त्यामुळे आमचं छान ट्यूनिंग जुळून आलं. निखळ मनोरंजनसोबत आमच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट प्रेक्षकांना या नाटकातून मिळेल असा विश्वास अंशुमनने व्यक्त केला.
अंशुमनकडून खूप काही शिकायला मिळतंय - हेमंत
हेमंतने म्हटलं की, 'अंशुमन सर आणि मी पहिल्यांदाच काम करतोय. एक वेगळा अनुभव मिळतोय. अभिनेता म्हणून खूप छान प्रोसेस अंशुमन सर करत असतात. त्यांच्याकडून ती शिकण्यासारखी आहे. अंशुमन सर छान समजून सांगतात. समोरच्या नटाला काय अपेक्षित आहे हे त्यांना लगेच समजत त्यामुळे अस छान वातावरणात काम सुरू आहे. वेगवेगळे प्रयोग आम्ही करत आहोत. नाटकातल्या माझ्या पात्राचा सुद्धा ते सराव करून घेतात. नाटकासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही करतोय आणि त्यात अंशुमन सरांकडून खूप शिकायला मिळतंय. आम्ही पहिल्यांदाच सोबत काम करतोय पण अस वाटत नाही की पहिल्यांदा करतोय.'
येत्या 22 ऑगस्टपासून ‘पाहिले न मी तुला' नाटकाच्या शुभारंभाचे रंगणार आहेत. गुरुवार 22 ऑगस्टला बालगंधर्व पुणे रात्रौ 9.30 वा.,शुक्रवार 23 ऑगस्ट रामकृष्ण मोरे नाट्यगृह रात्रौ 9.30 वा. शनिवार 24 ऑगस्ट सायं 4.00 वा. ,शुक्रवार 30 ऑगस्ट विष्णुदास भावे वाशी सायं 4.00 वा येथे नाटकाचे प्रयोग होणार आहेत.