Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Angelina Jolie Removed Breast : एका अभिनेत्रीने कॅन्सरच्या भीतीने आपले स्तन शस्त्रक्रियेद्वारे कायमचे काढले. या अभिनेत्रीला स्तनाचा कर्करोग झाला नाही. पण तो होऊ नये यासाठी तिने शस्त्रक्रिया केली.
Angelina Jolie Removed Breast : टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी (Breast Cancer) झुंज देत आहे. हिना खानने काही दिवसांपूर्वीच आपल्याला स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती दिली होती. ती सध्या रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. हिनापूर्वी काही अभिनेत्रींना ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास सहन करावा लागला आहे. पण एका अभिनेत्रीने कॅन्सरच्या भीतीने आपले स्तन शस्त्रक्रियेद्वारे कायमचे काढले.
या अभिनेत्रीला स्तनाचा कर्करोग झाला नाही. पण तो होऊ नये यासाठी तिने शस्त्रक्रिया केली. अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल अँजेलिना जोली ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
कर्करोगामुळे आई गमावली...
सुमारे 11 वर्षांपूर्वी अँजेलिना जोलीचे डबल मास्टेक्टॉमी ऑपरेशन केले होते. तिच्या आईला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे 2007 साली अँजेलिनाच्या आईने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर डॉक्टरांनी अँजेलिनाला अनुवांशिकतेच्या समस्यांमुळे तिला स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, अँजेलिनाला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता 87 टक्के होती आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता 54 टक्के होती.
कर्करोगापासून वाचण्यासाठी केली शस्त्रक्रिया
अँजेलिना जोलीने न्यूयॉर्क टाइम्समधील एका लेखात या सर्व गोष्टींबाबत भाष्य केले. अँजेलिनाने लिहिले होते की, 'जेव्हा मला माझे सत्य कळले तेव्हा मी सावध झाले आणि शक्यतो धोका टाळण्याचा प्रयत्न केला. मी ऑपरेशन करायचं ठरवलं. मी याची सुरुवात स्तनापासून केली कारण मला गर्भाशयाच्या कर्करोगापेक्षा स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त होता.
शस्त्रक्रियेमुळे आजाराची शक्यता कमी झाली...
वृत्तानुसार, अँजेलिनाने सांगितले की, शस्त्रक्रिया करून स्तन कापल्याने कर्करोगाचा धोका हा पाच टक्के इतकाच राहिला. कर्करोगामुळे आई गमावलेल्या अँजेलिनाने सांगितले की,'आता मी माझ्या मुलांना सांगू शकते की त्यांना स्तनाच्या कर्करोगामुळे आई गमावण्याची भीती नाही. आता त्यांना अस्वस्थ वाटेल असे काहीही बघायला मिळणार नाही. त्यांना फक्त माझ्या छोट्या जखमा आणि किरकोळ खुणा दिसतात बाकी काही नाही असेही तिने सांगितले.
स्त्रीत्वावर कोणताही परिणाम नाही...
अँजेलिना जोलीने पुढे म्हटले की,''मला आशा आहे की इतर महिलांना माझ्या अनुभवाचा फायदा होईल. कर्करोग हा शब्द अजूनही लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी पुरेसा आहे. ब्रेस्ट रिमूव्हलबद्दल अँजेलिनाने सांगितले की, मला स्त्री म्हणून मला काहीच कमीपणा वाटत नाही. याचा माझ्या स्त्रीत्वावर परिणाम झाला नाही. मास्टेक्टॉमी करणाऱ्या महिला शस्त्रक्रियेद्वारे त्यांचे हरवलेले सौंदर्य परत मिळवू शकतात. परंतु ज्या महिला आजारी नाहीत त्यांना असा निर्णय घेणे कठीण असल्याचेही तिने सांगितले.
स्तनांचा कर्करोग काय आहे?
स्तनांचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर हा स्तनांमध्ये गाठ आल्याने होतो. हा कर्करोग पुरुषांच्या तुलनेत महिलांना मोठ्या प्रमाणावर होतो. स्तनांमध्ये गाठ, काखेत गाठ येणे, निपलमधून रक्त येणे, स्तनावरील त्वचेचा रंग, आकार बदलणे आदी कर्करोगाची लक्षणे आहेत. स्तनांच्या कर्करोगावरील उपचार हा कोणत्या स्टेजची लागण झालीय यावर अवलंबून असतो. किमोथेरेपी, शस्त्रक्रिया आदी उपचार केले जाते.