Ambat Shoukin Official Teaser : 'पोरीची एक स्माईल भल्याभल्यांचं होत्याचं नव्हतं करू शकते...' सुसाट प्रेमवीरांना पिसाट करणारा ‘आंबट शौकीन’चा टीझर!
Ambat Shoukin : ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचा भन्नाट टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सुसाट प्रेमवीरांना पिसाट करणाऱ्या टीझरमधूनच धमाल कॉमेडी, जबरदस्त पंचेस आणि रंगतदार दृश्यांची झलक पाहायला आहे!

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनात हास्याचे कारंजे उडवणारा आणि धमाल किस्स्यांचा भरपूर डोस देणारा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाच्या रंगतदार पोस्टरने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर या चित्रपटाचा भन्नाट टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘आंबट शौकीन’ चा धमाल टीझर प्रदर्शित ..
टीझर पाहता चित्रपटात धमाल कॉमेडी, करामती पंचेस आणि हलक्याफुलक्या मस्तीचा रंगतदार मेळ असल्याचं स्पष्ट होतं. हा चित्रपट म्हणजे एका अतरंगी प्रवासाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘आंबट शौकीन’ ही कथा आहे तीन अवलिया मित्रांची – जे सोशल मीडियाच्या दुनियेत हरवलेले असताना प्रेमात यश मिळवण्यासाठी चाललेल्या त्यांच्या धडपडीची गोष्ट सांगतो. त्यांची मुली पटवण्याची मजेशीर मिशन आणि त्यातून होणारे गोंधळ यांचं विनोदी चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
‘आंबट शौकीन’ मध्ये पाहायला मिळणार कलाकारांची भलीमोठी फौज!
हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. चित्रपटात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर आणि किरण गायकवाड या त्रिकुटाच्या प्रमुख भूमिका असून त्यांना साथ दिली आहे प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर या मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकारांच्या ताफ्याने.दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, या चित्रपटाच्या माध्यमातून मी एक सामाजिकदृष्ट्या संवेदनशील पण मनोरंजनात्मक विषय हलक्याफुलक्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात खरी नाती कशी हरवली आहेत, हे विनोदी पद्धतीने मांडताना प्रेक्षक नक्कीच हसत-हसत विचार करायला लागतील.
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी
चित्रपटाची कथा स्वतः निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा आणि निलेश राठी या चित्रपटाचे निर्माते आहेत. पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे आणि अमित बेंद्रे यांनी लिहिले आहेत.
‘आंबट शौकीन’ हा धमाल आणि मनोरंजनाचा झणझणीत डोस घेऊन येणारा चित्रपट १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


















