अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख ठरली, जगभरातील 55 फिल्म्सचे होणार प्रदर्शन
Chhatrapati Sambhaji Nagar : महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (Ajantha Verul International Film Festival) घोषणा करण्यात आली असून, 3 ते 7 जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश
आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपटजाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.
भारतीय सिनेमा स्पर्धा
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.
भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक धृतीमान चॅटर्जी (कोलकाता) हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी) हे मान्यवर असणार आहेत.
फ्रिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फ्रिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फ्रिप्रेसीने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष एन. मनू चक्रवर्थी (बंगळूरू), श्रीदेवी पी. अरविंद (कोचीन), सचिन चट्टे (पणजी) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.
उद्घाटन सोहळा व जीवन गौरव पुरस्कार
चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 3 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा (आय.ए.एस.), प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मश्री मा. जावेद अख्तर यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी.रामाकृष्णन, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी, आयनॉक्सचे सिध्दार्थ मनोहर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली जर्मन भाषेतील फिल्म फॉलन लिव्हस फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल.
समारोप सोहळा
फेस्टिव्हलचा समारोप सोहळा 7 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी सात वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ज्ञानेश्वर चव्हाण, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांथ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून कान चित्रपट महोत्सवाची यावर्षीची सर्वोत्कृष्ट फिल्म अनॉटामी ऑफ फॉल (फ्रेंच) दाखविण्यात येणार आहे.
मास्टर क्लास व विशेष व्याख्यान
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. 4 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता आयनॉक्स येथे पा, चिनी कम, घुमर, शामीताभ, पॅडमॅन या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे ‘दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या मास्टर क्लासचे’ आयोजन करण्यात आलेले आहे.
- 4 जानेवारी 2024 रोजी सायं 6 वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक ‘पद्मश्री जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत’ आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्यासमवेत संवाद साधतील.
- 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे आर्टिकल 15, थप्पड, रा-वन, मुल्क या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे ‘दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या मास्टर क्लासचे’ आयोजन करण्यात आलेले आहे.
- 6 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2.30 वा. केंद्र शासन-पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदुम यांच्या 'गांधी आणि सिनेमा' या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ‘मीट द डिरेक्टर्स’ या सत्रात भारतीय सिनेमा गटातील सर्व दिग्दर्शकांसमवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्रपट रसिकांना या सिनेमांच्या दिग्दर्शकांसमवेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधता येईल.
- 7 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वा. ज्येष्ठ अभिनेते व ‘दिग्दर्शक ध्रृतीमान चॅटर्जी यांच्या मृणाल सेन समजून घेताना या विशेष संवादाचे आयोजन’ करण्यात आले आहे. महान चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांमधून श्री.चॅटर्जी यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.
कलाकारांची उपस्थिती व संवाद
स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा
महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख 25 हजार रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: