Abhinav Kashyap Claimed Salman Khan: 'माही गिलचं करिअर बर्बाद केलं, ओम पुरींच्या पाया पडायलाही नाही म्हटलं...'; सलमान खानवर दिग्गज दिग्दर्शकाकडून आरोपांची माळ
Abhinav Kashyap Claimed Salman Khan: दिग्दर्शक अभिनव कश्यपकडून पुन्हा एकदा सलमान खानवर खळबळजनक आरोप केलेत. माही गिलचं करिअर बर्बाद केल्याचा आरोपही केलाय.

Abhinav Kashyap Claimed Salman Khan: 'दबंग'चे (Dabang Movie) दिग्दर्शक अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) सलमान खानवर (Salman Khan) सतत निशाणा साधत आहेत आणि सलमान खानबाबत असंख्य दावे करत, अत्यंत खळबळजनक आरोपही करत आहेत. 'बिग बॉस 19'च्या एका भागात सलमान खानवर या सर्व आरोपांवर उत्तरही दिलेलं. पण, तरीसुद्धा दिग्दर्शक काही शांत बसायचं नाव घेईना. आता दिग्दर्शकानं सलमान खानवर सिनेमातल्या को-अॅक्टर्सचे रोल कापल्याचा आरोप लावला आहे. फिल्म निर्मात्यानं असाही दावा केलाय की, सलमान खाननं एका सीनमध्ये दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पाया पडायलाही नकार दिलेला. एवढंच नाहीतर, तो पूर्ण सीन रद्द करायला लावलेला.
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपनं 'बॉलीवूड ठिकाना'ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "दबंग हा 2.45 तासांचा सिनेमा होता, पण सलमान खाननं मला तो लहान करायला भाग पाडलं, तो 2 तास 20 मिनिटांचा केला. दरम्यान, सलमान खानला चित्रपटाच्या लांबीपेक्षा इतर कलाकारांच्या भूमिकांबद्दल जास्त त्रास होता. त्यानं अरबाजचा पूर्ण रोल काढून टाकला. अरबाजच्या भूमिकेचा प्रश्न भावांमध्ये सोडवला गेला. पण माही गिलनंही चित्रपटात भूमिका साकारलेली. ती सिनेमाची दुसरी मुख्य अभिनेत्री होती. पण त्यानं तिचा रोलच कमी केला. त्यानं तिचं करिअर उद्ध्वस्त केलं."
सोनाक्षीच्या बदल्यात माही दिसणार होती...
अभिनव कश्यपनं यादरम्यान माही गिलची माफी मागताना म्हटलं की, तिची रोल काढून टाकण्यात माझी कोणतीच भूमिका नव्हती. मी सुरुवातीला 'दबंग' सिनेमात माही गिलला सोनाक्षीची भूमिका 'रज्जो' ऑफर केलेली. पण, त्यावेळी मला कोणताच हिरो मिळत नव्हता. मग अरबाज खान प्रोड्यूसर म्हणून आला आणि हिरो सिलेक्ट करण्यात आला. मग मी माही गिलला फिल्ममध्ये अरबाजच्या गर्लफ्रेंडचा रोल दिला. तिनं मला कोणताच प्रश्न विचारला नाही. जे पैसे तिला दिले, ते तिनं घेतले. माहीला खूपच वाईट वागणूक दिली गेली..."
"सलमान खाननं ओम पुरींच्या पाया पडायला दिलेला नकार..."
अभिनय कश्यपनं ओम पुरी आणि सलमान खान यांच्यातल्या भांडणाचाही यावेळी उल्लेख केला. "ओम पुरी साहेबांची फिल्ममध्ये 5-6 सीन्स होते आणि ते सीन्स खूप चांगले होते. त्यांनी सीन्स ऐकल्यानंतरच सिनेमात काम करायला होकार दिलेला. पण सलमान खाननं ओम पुरींसोबत सीन करण्यास नकार दिला, ज्यामध्ये त्याला ओम पुरींच्या पाया पडावं लागणार होतं... सलमान खानला खूप अहंकार आहे. तो म्हणाला, "मी त्यांच्या पायाला स्पर्श करणार नाही..." त्यानं मला तो सीन 5-6 वेळा पुन्हा लिहायला लावला, जोपर्यंत तो त्याच्या मनासारखा झाला नाही तोपर्यंत..."
ओम पुरी सलमान खानला म्हणाले, "जाओ कुछ और करो..."
अभिनव कश्यपनं सांगितलं की, जेव्हा तो रिवाइज्ड सीन्ससह ओम पुरींकडे गेलेला, त्यावेळी ते माझ्यावरच रागावले. त्यांनी विचारलं की, सलमान खाननं सीन बदलण्यासाठी सांगितलंय? त्यानंतर ते सलमान खानजवळ गेले आणि त्याच्याशी बोलले. ते सलमान खानला म्हणाले की, तुम ऐसा क्यों करते हो? अल्लाह ने तुम्हें इतना कुछ दिया है, फिर तुम सबका रोल क्यों खा जाते हो? पण सलमान खान काहीच बोलला नाही. ओम पुरींनी रोल करायला नकार दिला आणि सलमान खान त्यांना अत्यंत उद्धटपणे म्हणाला की, नहीं करना, जाओ कुछ और करो... ओम पुरी त्यावेळी खूपच नाराज झालेले.


















