(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinesh Phogat : तुझी माफी मागण्याची लायकी नाही, तुला दंडवत, भाजपमध्ये गेलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत!
Abhijeet Kelkar on Vinesh Phogat : अभिनेता अभिजीत केळकरने विनेशा फोगाटच्या दमदार कामगिरीवर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Abhijeet Kelkar on Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesha Phogat) हिने पॅरिस ऑलम्पिकच्या (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत धडक देत भारतीयांच्या सुवर्णाआशा उंचावल्या आहेत. भारताच्या या लेकीच्या कामगिरीची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दखल घेतली जातेय. विनेशने क्युबाच्या गुझमान लोपेझ हिला पराभूत करत विजय आपलासा केला. त्यामुळे तिच्यावर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला अभिनेता अभिजीत केळकर याने देखील विनेशसाठी पोस्ट लिहिली आहे.
काही महिन्यांपूर्वी याच विनेश फोगाटने दिल्लीत भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे बाहुबली नेते बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आवाज उठवला होता. बृजभूषण सिंह यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप विनेश फोगाटने केला होता. त्याविरुद्ध दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्तीपटू रस्त्यावर उतरले होते. पण त्यावेळी त्यांना दिलेल्या वागणुकीचाही बराच निषेध करण्यात आला. त्यामुळे आता विनेशने केलेल्या कामगिरीवर साऱ्यांना अभिमान वाटतोय. या सगळ्यात आता विनेशने जर सुवर्ण पदक जिंकलं तर हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरेल.
अभिजीतची पोस्ट काय?
अभिजीतने त्याच्या फेसबुकवर पोस्ट करत विनेशसाठी पोस्ट केली आहे. त्याने म्हटलं की, 'आम्ही चुकलो. मानवनिर्मित देवदेवतांची पूजा करत राहिलो, तुझ्यातल्या स्त्रीत्वाला पायदळी तुडवलं, तुझ्यावर अत्याचार केले. पण तू हरली नाहीस. खरंतर तुझी माफी मागायचीही आमची लायकी नाही. तुझ्यातल्या स्त्रीशक्तीला साष्टांग दंडवत. ' अभिजीत केळकरने काही महिन्यांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आता त्याने केलेल्या पोस्टची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
विनेशसाठी कलासृष्टीची पोस्ट
दरम्यान विनेशच्या या विजयावर कलासृष्टीतून आनंद साजरा केला जातोय. अनेक कलाकारांनी तिच्यासाठी पोस्ट करत तिच्या या विजयाचं कौतुक केलंय. अभिनेता आस्ताद काळे याने पोस्ट करत म्हटलं की, कुस्तीची लढत संपताक्षणी झालेला विनेश फोगात यांचा चेहरा बघण्यासारखा होता... तरी बघवत नव्हता. मला खूप काही भासलं त्या चेह-यावर... साधारण 2 वर्ष सहन केलेल्या सगळ्याची वेदना,आपल्याच व्यवस्थेकडून झालेल्या अपमान आणि अवहेलनेची चीड, त्या सगळ्यावर मात करत मेहनत करून करून गाठलेलं आजच्या जेतेपदाचं समाधान, जगातील अव्वल क्रमांकावर असलेल्या खेळाडूला हारवल्याचा आनंद आणि या व्यवस्थेला, झालेल्या अन्यायाला, भोगलेल्या अवहेलनेला आपल्या कर्तृत्वानी दिलेल्या सडेतोड उत्तराचा आवेश. ही खरी शक्ती, तिच्या चेह-यावर "शक्ती" होती, ते काही क्षण तीच "शक्ती" होती.