Movie Review | आगळा एबी आणि खमका सीडी!
कधी आधीच्या पिढीला नव्या पिढीच्या बुटात पाय घालता येत नाही. कधी नव्या पिढीला जुन्या पिढीचा चष्मा चढवता येत नाही अशाने विसंवाद वाढतो. पण हा सगळा दृष्टिकोनाचा भाग आहे. माणसाकडे बघण्याचा कोन बदलला की बऱ्याच गोष्टी बदलतात.. सुकर होतात. एबी आणि सीडी हा या अशा बदललेल्या दृष्टिकोनावर भाष्य करणारा सिनेमा आहे.
दोन पिढ्यांमध्ये असलेली गॅप वाढली की वाद सुरू होतात. घरोघरी हे चित्र पाहायला मिळतं. यात कोणी एक चूक असतोच असं नाही. पण स्थिती, परिस्थिती याला कारणीभून असते. कधी आधीच्या पिढीला नव्या पिढीच्या बुटात पाय घालता येत नाही. कधी नव्या पिढीला जुन्या पिढीचा चष्मा चढवता येत नाही अशाने विसंवाद वाढतो. पण हा सगळा दृष्टिकोनाचा भाग आहे. माणसाकडे बघण्याचा कोन बदलला की बऱ्याच गोष्टी बदलतात.. सुकर होतात. एबी आणि सीडी हा या अशा बदललेल्या दृष्टिकोनावर भाष्य करणारा सिनेमा आहे. मिलिंद लेले यांनी विक्रम गोखले यांना हाताशी धरून नव्या सिनेमाची उभारणी केली आहे. ती करताना गोष्टीची गरज म्हणून त्यांनी या सिनेमात साक्षात अमिताभ बच्चन यांना घ्यावं लागलं आहे. बच्चन यांच्या सहभागाने हा सिनेमा इतरांपेक्षा विशेष ठरतो.
ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत देशपांडे हे आता पंच्याहत्तरीला आले आहेत. मूळचे चित्रकलेचे शिक्षक असलेले देशपांडे यांनी पत्नी गेल्यानंतर चित्रकला सोडली आहे. आता त्यांचे घरीही खटके उडू लागले आहेत. दोन मुलं, सुना नातवंड असा कुटुंब कबिला असूनही जनरेशन गॅपचा फटका देशपांडे यांना बसू लागला आहे. त्यामुळे आता ते बेजार झाले आहेत. त्याची ही अवस्था त्यांच्या नातवांना कळते आणि मग ते एक गंमत करतात.. एक पत्र हाताशी धरून आपल्या आजोबांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पुढे या खेळाचं काय होतं.. आजोबांसमोर काही नवी आव्हानं उभी राहतात का.. सिनेमात पुढे अमिताभ बच्चन कधी येतात.. आल्यावर काय करतात याचा सगळ्याचा हा सिनेमा बनला आहे.
विक्रम गोखले यांचा अभिनय ही याची जमेची बाजू. सिनेमात अमिताभ बच्चन असल्यामुळे त्याचं दर्शन सिनेमात कधी होणार याची उत्सुकता लागून राहते पण त्याचा विसर पडतो ते विक्रम गोखले यांचा अभिनय पाहिल्यानंतर. घरच्या स्थितीला वैतागलेला चंद्रकांत देशपांडे, पत्नीच्या हळव्या आठवणीत रमणारा देशपांडे.. ज्येष्ठ मित्रांच्या संगतीत रमणारा देशपांडे आणि नातवांच्या प्रतापानंतर हवालदिल झालेला देशपांडे पाहताना नजर खिळून राहते. अचूक संवादफेक आणि पॉज या दोन शस्त्रांवर त्यांनी देशपांडे पेलला आहे.
दिग्दर्शकाने एक सोपी कथा घेऊन सिनेमा बनवला आहे. फक्त त्याची धाटणी काहीशी जुनी वाटते. म्हणजे, सुरूवातीला दोन पिढ्यांमधली गॅप दाखवताना सुनांच्या तोंडी असलेले संवाद पाहता त्या ग्रे शेडमध्ये जातायत की काय असं वाटतं.. त्याचवेळी घरी सुनेच्या मैत्रिणी आल्या असताना चित्रांवरून देशपांडेंनी तिथेच वाद घालायला बसणं हे अनाकलनीय वाटतं. कारण नंतर देशपांडे कमालीचे संतुलीत आणि सर्वंकष विचार करणारे वाटत राहतात. सिनेमाचा एकूण विषय त्याची हाताळणी पाहता ठरलेल्या गोष्टीशी इमान राखून हा सिनेमा चितारला आले. त्यला नेटक्या छायांकनाची जोड लाभली आहे. अर्थात अमिताभ बच्चन यांचं सिनेमात असणं यामुळे हा सिनेमा वेगळाच ठरतो. पुढे अमिताभ आल्यानंतर तर सिनेमाचा ऑराच बदलतो.
सिनेमाची एकूण गोष्ट.. त्यातले संवाद यामुळे हा सिनेमा ज्येष्ठ नागरिकांना किंवा ज्येष्ठ होऊ घातलेल्यांना नक्की आवडणारा आहे. अबालवृद्धांना पाहता येईल असा हा सिनेमा बनवला आहे. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत तीन स्टार्स. विक्रम गोखले यांचा अभिनय आणि अमिताभ यांचा ऑरा अनुभवायचा असेल तर सिनेमा पाहायला हरकत नाही.