135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार, 'काळी माती' चित्रपटाने विश्वविक्रम केल्याचा दावा
हेमंतकुमार महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने केवळ 135 दिवसांत 159 पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक करतात.

मुंबई : मराठी चित्रपट नेहमीच आशयघन आशय निर्मितीकडे लक्ष देत असतो. मराठी चित्रपटाचं एकूण बजेट आणि त्याचं गणित पाहता हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटांशी या चित्रपटाची तुलना केली तर मराठी चित्रपट त्या स्पर्धेत उतरणं अवघड होऊन बसेल. म्हणूनच मराठीने नेहमीच आशयघन विषयांची कास धरली. अनेक मराठी चित्रपट देशा-परदेशातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उठवताना दिसतात. पण मराठीची मान उंचावणारी एक बातमी एबीपी माझा देते आहे. हेमंतकुमार महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने केवळ 135 दिवसांत 159 पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक करतात.
काळी माती हा चित्रपट प्रगतशील आणि आदर्श शेतकरी ठरलेले ज्ञानेश्वर बोडखे यांच्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. शेतीमध्ये रस घेऊन त्यानंतर जवळपास 400कोटींची आर्थिक उलाढाल करणाऱ्या या शेतकऱ्याची स्फूर्तीदायी कहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशानेच महाले यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. एबीपी माझासोबत बोलताना दिग्दर्शक महाले म्हणाले, यापूर्वी मी सांगितिक क्षेत्रात काम करत होतो. ते करत असतानाच ही गोष्ट करायची ठरली. आता हा सिनेमा पूर्ण झाला आहेच. आम्हाला खरंतर आता रिलीज करायचा होता चित्रपट. पण लॉकडाऊन लागला आणि आता तो संपायची आम्ही वाट बघतोय.'
काळी माती चित्रपटात ओमप्रकाश शिंदे, आतिशा संझगिरी, दीक्षा भोर, भगवान पाचोरे आदींच्या महत्वाच्या भूमिका आहेत. महाले या मिळालेल्या पुरस्कारांबद्दल बोलताना म्हणाले, '135 दिवसांत 159 पुरस्कार हा विक्रम आहे. आम्ही यासाठी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. पण त्याची चाचपणी होऊन रिपोर्ट यायला ३६ आठवडे लागतात. त्याचीही प्रोसेस सुरू आहे. सिंगापूर, रोम, अमेरिका आदी जगभरात कानाकोपऱ्याच होणाऱ्या फेस्टिवलमध्ये या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
